‘तासगाव’च्या राजकीय घडामोडींना वेग
By Admin | Updated: March 29, 2015 00:42 IST2015-03-29T00:40:34+5:302015-03-29T00:42:39+5:30
निवडणुकीसाठी प्रशासनही सज्ज : ‘बिनविरोध’च्या चर्चेला पूर्णविराम

‘तासगाव’च्या राजकीय घडामोडींना वेग
तासगाव : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत बिनविरोधचा विषय केवळ चर्चेचाच राहिला आणि निवडणूक लागलीच. राष्ट्रवादीच्या सुमनताई पाटील यांच्यासह नऊजण रिंंगणात आहेत. या निवडणुकीसाठी ११ एप्रिल रोजी मतदार होणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे राजकीय वर्तुळात हालचाली सुरू झाल्या आहेत, तर दुसरीकडे प्रशासनही सज्ज झाले आहे.
११ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ५ या वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने एकूण मतदान प्रक्रियेचा तयार केलेला कार्यक्रम पाहता आता प्रचारासाठी वेळ कमी उरला आहे.
काही महिन्यांपूर्वीच विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पाडणाऱ्या याच प्रशासनावर पुन्हा तीच प्रक्रिया पार पाडण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे मागील निवडणुकीची प्रक्रिया पार पाडणारेच अधिकारी याही निवडणुकीत आहेत. मतदारसंघात दोन तालुक्यांचा समावेश असला तरी निवडणूक कार्यालय तासगावात आहेत.
मतदारसंघात २८५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी १ हजार ५०० कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यांचे पहिले प्रशिक्षण दि. ३० रोजी, तर दुसरे दि. ५ रोजी होणार अहे. ११ रोजीच्या मतदानानंतर १५ एप्रिल रोजी मतमोजणीची प्रक्रियाही तासगावातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील बहुउद्देशीय सभागृहात होणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर यंत्रणा सज्ज झाली आहे. अद्याप जाहीर सभा, पदयात्रा, दुचाकींच्या रॅली अशा प्रकारच्या प्रचाराला सुरुवात झालेली नाही. एक-दोन दिवसात जाहीर प्रचारही सुरू होईल. त्यानंतर निवडणुकीचे वातावरण तयार होणार आहे.
मतदानाच्या टक्केवारीकडे लक्ष
या पोटनिवडणुकीत एकूण मतदान किती टक्के होणार, हा विषय महत्त्वाचा आहे. पोटनिवडणूक, त्यात उन्हाळ्याचा हंगाम असल्याने याकडे लक्ष लागून राहणार आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार सुमनताई पाटील व अपक्ष अर्ज दाखल केलेल्यांमध्ये स्वप्नील पाटील यांच्यातच प्रमुख लढत होईल, हेही स्पष्ट झाले आहे. या दोन्ही उमेदवारांचा प्रचारही सुरू झालेला आहे. (वार्ताहर)