‘ट्रॅफिक’कडील अत्याधुनिक वाहने शासनाने घेतली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:20 IST2021-05-31T04:20:43+5:302021-05-31T04:20:43+5:30

सांगली : जिल्ह्यातील वाहतूक नियंत्रणासह नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलीस दलात दाखल झालेली अत्याधुनिक वाहने आता शासनाने परत घेतली आहेत. ...

The state-of-the-art vehicles from 'Traffic' were taken back by the government | ‘ट्रॅफिक’कडील अत्याधुनिक वाहने शासनाने घेतली परत

‘ट्रॅफिक’कडील अत्याधुनिक वाहने शासनाने घेतली परत

सांगली : जिल्ह्यातील वाहतूक नियंत्रणासह नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलीस दलात दाखल झालेली अत्याधुनिक वाहने आता शासनाने परत घेतली आहेत. गेल्याच वर्षी शासनाने दोन वाहने दिली होती ज्यात स्पीडगन, ब्रेथ ॲनालायझरसह इतर सुविधा होत्या. आता महामार्ग पोलिसांकडे ही वाहने वर्ग झाली आहेत, तर वाहतूक शाखेला ‘११२’ वाहनांद्वारे शहरभर कारवाईसाठी फिरावे लागत आहे.

वाहतूक नियमनाच्या कडक अंमलबजावणीसह बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यावर कारवाई व्हावी यासाठी शासनाने वाहनातच स्पीडगन, ब्रेथ ॲनालायझरची यंत्रणा त्यात होती. जिल्हा पोलीस दलात सांगली व मिरज वाहतूक शाखेला ही वाहने मिळाली होती. शहरातील प्रमुख मार्गासह रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नियम मोडणाऱ्या वाहनांवरही पोलीस याद्वारे कारवाई करत होते. पोलिसांचे हे वाहन रस्त्याकडेला दिसले तर वाहनधारकही आपली गती आपोआप कमी करत होते. दीड वर्षापूर्वी या वाहनांचा लोकार्पण सोहळाही झाला होता. दोन्ही विभागांतील वाहतूक शाखेकडे असलेली जुनी वाहने जाऊन नवीन वाहने आणि सोयीसुविधा असलेली वाहने आल्याने कारवायांमध्येही गती आली होती. आता या विभागास अन्य वाहने देण्यात आली असली तरी स्पीडगनसाठी वेगळ्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे.

कोरोनाच्या स्थितीमुळे वाहनधारकांवरील कारवाईचा वेग वाढला असला तरी त्यात विनाकारण फिरणे यासह मास्कचा वापर न करणे यासाठी कारवाया होत आहेत. वाहनधारकांचा वेग अचूक टिपून वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी स्पीडगन उपयोगी होती. स्पीडगनद्वारे केवळ फोटो घेऊन उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकाला थेट दंडाचे चलन पोहोच होत होते.

शासनाने आता ही वाहने परत घेतली असून ती महामार्ग पोलिसांच्या दिमतीला कार्यरत असणार आहेत.

चौकट

वाहनधारक होणार सुसाट

शहरातील कोल्हापूर रोड, माधवनगर रोड, सांगली-मिरज रोडवर वाहतूक शाखेची ‘स्पीडगन’ कार्यरत असे. सध्या कोरोना स्थितीमुळे या कारवाया थांबल्या असल्या तरी लवकरच सुरू होणार आहेत. त्यावेळी स्पीडगन नसल्याने वाहनधारक पुन्हा सुसाट होण्याचीच शक्यता आहे.

चौकट

स्पीडगनचा वापर करताना वेग मर्यादेचे फलक ठिकठिकाणी असणे बंधनकारक आहे. मात्र, असे फलक लावलेले नसल्याने ही वाहने परत घेतल्याचे समजते.

Web Title: The state-of-the-art vehicles from 'Traffic' were taken back by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.