‘टेंभू’च्या मोटारी २५ पर्यंत सुरू
By Admin | Updated: November 15, 2016 23:44 IST2016-11-15T23:44:19+5:302016-11-15T23:44:19+5:30
मुख्यमंत्र्यांचे आदेश : गोपीचंद पडळकर यांची माहिती; आटपाडी तालुक्यात लाभ

‘टेंभू’च्या मोटारी २५ पर्यंत सुरू
आटपाडी : टेंभू योजनेच्या मोटारी दि. १५ रोजी बंद न करता आटपाडी तालुक्यातील गावांना पाणी देण्यासाठी शुक्रवार दि. २५ नोव्हेंबरपर्यंत त्या सुरू ठेवाव्यात, अशी आणखी १0 दिवसांची वाढ करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिल्याची माहिती भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिली.
आटपाडी तालुक्यात पावसाअभावी सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती आणखी भयानक होऊ नये यासाठी टेंभू योजनेचे पाणी ओढे आणि तालुक्यातील तलावांतून सोडण्यात आले आहे. मात्र कौठुळी, बोंबेवाडी, देशमुखवाडी, आंबेवाडी, खवासपूर, लोटेवाडी या गावांना या पाण्याचा लाभ होण्यासाठी माणगंगा नदीत पाणी सोडण्याची मागणी या गावांतील ग्रामस्थांनी केली होती. या गावांतील ग्रामस्थांनी प्र्रसंगी येणाऱ्या जि. प. आणि पं. स.च्या निवडणुकींवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता. या गावांतील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर उपोषणही केले होते. त्यानंतर निंबवडे तलावातून विठलापूर येथील ओढ्यामार्गे माणगंगा नदीत पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. माणगंगा नदीत पाणी पोहोचेपर्यंत मंगळवार दि. १५ पासून टेंभूच्या मोटारी बंद करण्यात येणार होत्या. या गावांतील ग्रामस्थांनी भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांना भेटून सोमवारी विनंती केली होती. (वार्ताहर)
मुंबईत चर्चा : पाटबंधारे मंत्र्यांच्या सूचना
मंगळवारी गोपीचंद पडळकर यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी टेंभूच्या मोटारी आणखी १0 दिवस चालू ठेवण्यात याव्यात अशी विनंती केली. तसे निवेदनही दिले. मुख्यमंत्र्यांनी पाटबंधारेमंत्री गिरीश महाजन यांना तात्काळ तसे आदेश दिले. मंत्री महाजन यांची पडळकर यांनी भेट घेतली. तेव्हा सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता गुणाले तिथे होते. महाजन यांनी त्यांना आणखी १0 दिवस टेंभू योजना सुरू ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याचे सांगून कार्यवाही करण्याचे आदेश दिले.