शिराळ्यात रुग्णालयाचे काम सुरू
By Admin | Updated: November 18, 2016 23:41 IST2016-11-18T23:41:08+5:302016-11-18T23:41:08+5:30
मानसिंगराव नाईक : पन्नास खाटांचे रुग्णालय उभारणार; १५ कोटी मंजूर

शिराळ्यात रुग्णालयाचे काम सुरू
शिराळा : येथे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीच्यादृष्टीने प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. यामुळे तालुक्यातील नागरिकांच्या दृष्टीने वैद्यकीय उपचाराची मोठी सोय होणार असल्याची माहिती माजी आमदार मानसिंंगराव नाईक यांनी दिली. शिराळा येथे जुन्या शासकीय रुग्णालयाची इमारती पाडून उपजिल्हा रुग्णालय उभारणीच्या दृष्टीने सुरू झालेल्या कामाची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, ग्रामीण, डोंगराळ व अति मागास तालुक्याचा विचार करून शिराळा येथे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर करण्याबाबत मी लोकप्रतिनिधी असताना प्रयत्न केले. येथील भौगोलिक परिस्थिती, जनतेची मागणी व गरज लक्षात घेऊन आघाडी शासनाने येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयास १७ जानेवारी २०१३ ला मंजुरी दिली होती. १३ मार्च २०१५ रोजी झालेल्या सचिव समितीच्या बैठकीत रुग्णालय बांधकामाच्या १४.७६ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मंजुरी दिली होती. त्याचे राजपत्र सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने ३ जून २०१५ रोजी जाहीर केले होते. आता प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला आहे.
या उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीनंतर आरोग्यासाठी आवश्यक तातडीच्या व प्रगत सुविधा सर्वसामान्यांना उपलब्ध होतील. सांगली, कोल्हापूर, कऱ्हाडकडे जाऊन खासगी रुग्णालयात घेतल्या जाणाऱ्या खर्चिक उपचाराच्या जोखडातून मुक्ती मिळून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल. सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी समाजाची गरज ओळखून दोन वर्षापूर्वी केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. शिराळा तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने ही महत्त्वाची बाब आहे.
यावेळी तालुक्याचे माजी सभापती अॅड. भगतसिंंग नाईक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, ‘विश्वास’चे संचालक भीमराव गायकवाड व विश्वास कदम, शिराळ्याचे माजी सरपंच गजानन सोनटेव देवेंद्र पाटील, माजी उपसरपंच संभाजी गायकवाड, सुनील कवठेकर व बाबा कदम, के. वाय. मुल्ला, गौतम पोटे, पंचायत समितीचे सदस्य लालासाहेब तांबीट यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)