तासगाव, नागेवाडी कारखान्याची बिले देण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:19 IST2021-06-20T04:19:29+5:302021-06-20T04:19:29+5:30
सांगली : तुरची (ता. तासगाव) एसजीझेड व एसजीए शुगर, नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत शुगर कारखान्यास ऊस घातलेल्या शेतकऱ्यांचा ...

तासगाव, नागेवाडी कारखान्याची बिले देण्यास सुरुवात
सांगली : तुरची (ता. तासगाव) एसजीझेड व एसजीए शुगर, नागेवाडी (ता. खानापूर) येथील यशवंत शुगर कारखान्यास ऊस घातलेल्या शेतकऱ्यांचा एकही रुपया बुडणार नाही, असे आश्वासन खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिले. शनिवारपासून शेतकऱ्यांची बिल देण्यास सुरुवात केली असून, २५ दिवसांत सर्व बिले मिळतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खा. पाटील म्हणाले, साखर उद्योग अडचणीत आहे. दहा वर्षे बंद असलेले कारखाने चालविण्यास घेतल्यामुळे दुरुस्तीसाठी खर्च जास्त झाला आहे. यामुळे या हंगामामध्ये वेळेत पैसे देता आले नाहीत. पण, शेतकऱ्यांच्या एक रुपयाही चुकीच्या ठिकाणी खर्च झाला नाही. कारखाने केवळ साखर उत्पादन करून चालू शकत नाहीत. त्यामुळे को-जनरेशन आणि डिस्टिलरी प्रकल्प सुरु करण्यासाठी पैसे खर्च झाले आहेत. कारखाना आर्थिक संकटात असल्यामुळे बँकांनी पैसे दिले नाहीत. शेवटी काही पतसंस्थांकडून जादा व्याजाने पैसे उचलले आहेत. शनिवारपासून बँक खात्यावर पैसे वर्ग करण्यास सुरुवात केली आहेत. येत्या २५ दिवसांत सर्व शेतकऱ्यांना पैसे दिले जातील.
चौकट
उद्योग सुरू करणे गुन्हा आहे का?
मी राजकारणाचा कधीही उद्योग म्हणून वापर केला नाही. कृष्णा खोरे महामंडळाचा पदाधिकारी असताना अनेकांची काम केली. पण, कधीही ठेकेदार, अधिकारी आणि व्यक्तींकडून पैसे घेतले नाहीत. मग, मी जर जगण्यासाठी एखादा व्यवसाय केला तर तो गुन्हा आहे का, असा सवालही खा. पाटील यांनी केला. मी उत्तर प्रदेशात चौघा खासदारांच्या मदतीने एक उद्योग सुरू करत आहे. त्यात माझे पैसे गुंतविले आहेत. शेतकऱ्यांचा एक रुपयाही गुंतविला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चौकट
व्यक्त केली दिलगिरी
ऊस उत्पादकांचे पैसे देण्यास उशिर झाला, याबद्दल शेतकऱ्यांची माफी मागतो. पण, एकाही शेतकऱ्याचा पैसा बुडणार नाही, असे आश्वासन खा. पाटील यांनी शेतकऱ्यांना दिले.