मिरजेतून रेल्वे पॅसेंजर गाड्या सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:31 IST2021-09-17T04:31:34+5:302021-09-17T04:31:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : मिरज ते पुणे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाच्या पाहणीसाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी व ...

मिरजेतून रेल्वे पॅसेंजर गाड्या सुरू करा
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरज ते पुणे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाच्या पाहणीसाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी व पुणे विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी गुरुवारी मिरज रेल्वे स्थानकास भेट दिली. या वेळी मिरजेतून कोल्हापूर, बेळगाव, सातारा व पंढरपूर पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची मागणी रेल्वे कृती समितीतर्फे करण्यात आली. राज्य शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर पॅसेजर रेल्वे सुरू होणार असल्याचे लाहोटी यांनी सांगितले.
कोल्हापूर, मिरज, सांगली, पंढरपूर, बेळगाव परिसरात शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनात नोकरी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाउनमुळे गेले वर्षभर पॅसेंजर रेल्वे बंद असल्याने दररोज प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासनाने कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्याच्या अटीवर पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्याची व मिरज स्थानकात पिट लाईन सुरू करण्यासह प्रवासी सुविधांबाबत इतर मागण्यांचे निवेदन कृती समितीने दिले. महाव्यवस्थापकांनी रेल्वे प्रशासनाची पॅसेंजर सेवा पूर्ववत सुरू करण्याची तयारी आहे. रेल्वे मंत्रालयाचीही त्यास मान्यता आहे. मात्र, राज्य शासनाकडून अद्याप परवानगी मिळाली नसल्याचे सांगितले. राज्य शासनाने परवानगी दिल्यास पॅसेंजर रेल्वे सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या वेळी रेल्वे कृती समितीचे मकरंद देशपांडे, गजेंद्र कुळ्ळोळी, सुकुमार पाटील, अजिंक्य हंबर, ज्ञानेश्वर पोतदार आदी उपस्थित होते.