जुन्याच पुस्तकांवर ऑनलाईन शिक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:36 IST2021-06-16T04:36:15+5:302021-06-16T04:36:15+5:30

सांगली : जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे शाळा सुरू होणार नाहीत. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने मंगळवारपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू ...

Start learning online on old books | जुन्याच पुस्तकांवर ऑनलाईन शिक्षण सुरू

जुन्याच पुस्तकांवर ऑनलाईन शिक्षण सुरू

सांगली : जिल्ह्यात कोरोना संसर्गामुळे शाळा सुरू होणार नाहीत. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शासनाने मंगळवारपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू केले आहे. नवीन पुस्तकांची छपाई झाली नसल्याने जुन्या पुस्तकांवरच ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत, त्यांची जवळच्या विद्यार्थ्यांकडे सोय केली आहे. शिक्षकांची मात्र शाळेत १०० टक्के उपस्थिती होती.

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली असली तरी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये येणारी तिसरी लाट बालकांसाठी धोक्याची असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. कोरोनामुळे मागील वर्षापासून शाळांचे वर्ग भरलेले नाहीत. गतवर्षी संपूर्ण वर्ष ऑनलाईन शिक्षण झाले. कोरोनामुळे परीक्षा न घेता सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिला. यंदाही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने मंगळवारपासून ऑनलाईन शाळा सुरू केल्या आहेत. ऑनलाईन शिकवणी दिली जाणार असली तरी यावेळी शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. त्यामुळे शिक्षकांची शाळेत १०० टक्के उपस्थिती होती.

जिल्ह्यात जिल्हा परिषद प्राथमिकच्या १६८८, माध्यमिक ७१७, महापालिका क्षेत्रात ५१ आणि नगरपालिका क्षेत्रात ३५ शाळा आहेत. सव्वादोन लाख विद्यार्थी आहेत. सर्व शिक्षण अभियानामधून विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. मात्र गेले वर्षभर कोरोनाची साथ सुरूच राहिल्याने यंदा नवीन पुस्तकांची छपाई झालेली नाही. विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके पुन्हा शाळेत जमा करुन घेतली आहेत. शाळांमध्ये जमा झालेल्या पुस्तकांचे वाटप करण्यात येत असले तरी सर्व विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तके पुरेशी नसल्याच्या तक्रारी पहिल्याच दिवशी आल्या आहेत.

शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे, अशी शासनाची भूमिका असली तरी काही विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नसल्याबाबतची माहितीही समोर आली आहे. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, त्यांची जवळच्या विद्यार्थ्यांकडे सोय करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे स्मार्ट फोन आहे, त्या पालकांशी संवाद साधून इतर विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न शिक्षकांकडून सुरू असल्याची माहिती शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी दिली.

Web Title: Start learning online on old books

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.