जत : राज्यातील नऊ जिल्ह्यासाठी शिरवळ (पुणे) येथे एकमेव पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे. पश्चिम महाराष्ट्रात आणखी एक पशुवैद्यकीय महाविद्यालय होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील शेतकरी सक्षम करण्यासाठी राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने जत तालुक्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी आमदार विक्रम सावंत यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे.
ते पुढे म्हणाले, जत तालुका विस्ताराने मोठा आहे. पर्जन्यमान कमी आहे. दुष्काळ परिस्थितीमुळे शेतीला जोड व्यवसाय म्हणून येथील शेतकरी पशुधन व्यवसायाकडे वळला आहे. तालुक्यात माडग्याळ शेळी व मेंढी, खिलार बैल व गायीची पैदास येथे केली जात आहे. जत औद्योगिक वसाहत जवळ ३९९ हेक्टर जमीन उपलब्ध असून तेथे सध्या खिलार कॅटल फार्म सुरू आहे. पशुधन वाचविण्यासाठी व पशुधनात वाढ होण्यासाठी पशुवैद्यकीय डॉक्टरांची गरज लक्षात घेऊन जत येथे नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय निर्माण करणे महत्त्वाचे आहे असे सभागृहात त्यांनी स्पष्ट केले.
तालुका विस्ताराने मोठा असून रोजगाराचा प्रश्न येथे गंभीर आहे. पशुधन विकास महामंडळाकडे जवळपास ३९९ हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. शिरवळ महाविद्यालयातून प्रत्येक वर्षी पास होऊन साठ विद्यार्थी बाहेर पडतात. तालुक्यातील पशुवैद्यकीय डॉक्टरांची संख्या लक्षात घेता तालुक्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय होणे आवश्यक आहे. त्यामुळे दुष्काळी भागात व्यवसाय शिक्षणास महत्त्व प्राप्त होणार आहे.