सांगलीत नाकाबंदी सुरूच

By Admin | Updated: December 2, 2014 00:14 IST2014-12-01T23:41:14+5:302014-12-02T00:14:51+5:30

‘धूम’ टोळीवर ‘वॉच’ : वाहनधारकांची तपासणी

Stalled blockade in Sangli | सांगलीत नाकाबंदी सुरूच

सांगलीत नाकाबंदी सुरूच

सांगली : गेल्या महिन्यापासून ‘धूम’ स्टाईल टोळीने शहरात धुमाकूळ घालून, बँकेतून रोकड काढून बाहेर पडणाऱ्या ग्राहकांकडील रक्कम लुटण्याचा उद्योग सुरु केल्याने, या पार्श्वभूमीवर गेल्या दहा दिवसांपासून पोलिसांची सुरु असलेली नाकाबंदीची मोहीम आज, सोमवारीही सुरु होती. शहरातील विविध मार्गावर नाकाबंदी करुन संशयित वाहनधारकांची धरपकड केली जात आहे. गेल्या दहा दिवसात सुमारे बाराशेहून अधिक दुचाकींवर कारवाई करुन एक लाखाहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
पुष्पराज चौक, जिल्हा परिषद, कर्नाळ पोलीस चौकी या तीन ठिकाणी बँकेतून बाहेर पडणाऱ्या ग्राहकांना ‘धूम’ टोळीने नुकतेच लुटले. भरदिवसा या घटना घडल्याने पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली. या घटना रोखण्यासाठी व टोळीतील गुन्हेगारांना पकडण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी शहरातील गस्त वाढविली. पुष्पराज चौक, आमराई रस्ता, कर्नाळ पोलीस चौकी, राममंदिर कॉर्नर, आमराई यासह शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर पडणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गेल्या दहा दिवसांपासून दररोज सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत नाकाबंदी केली जात आहे.
‘धूम’ टोळीने आतापर्यंत १३ लाखांची रक्कम लुटली आहे. घटनेनंतर चोरटे दुचाकीवरुन पसार होतात. प्रत्येक गुन्हा करताना त्यांनी गुन्ह्याचे तंत्र बदलले असले तरी, ही टोळी एकच असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. नाकाबंदीमुळे या घटनांना आळा बसला आहे. रस्त्यावर पोलिसांची संख्या वाढल्याने वाहतुकीतही सुधारणा झालेली आहे. नाकाबंदीत विशेषत: दुचाकी अडवून चौकशी केली जात आहे. वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) नसेल, तर दंडात्मक कारवाई केली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Stalled blockade in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.