The staff eye at school premises at Tasgaon | तासगावमधील शाळांच्या जागांवर कारभाऱ्यांचा डोळा
तासगावमधील शाळांच्या जागांवर कारभाऱ्यांचा डोळा

ठळक मुद्देनागरिकांचा रोष : अकरा नंबर शाळेच्या मैदानावर जलशुध्दीकरण प्रकल्पाचा घाट

दत्ता पाटील ।
तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या शाळांच्या जागांवर पालिकेतील कारभाऱ्यांचा डोळा असल्याचे चित्र काही निर्णयांतून दिसत आहे. यापूर्वी पालिकेच्या बारा नंबर शाळेच्या मैदानाचा निर्णय हाणून पाडण्यात आला होता. आता पुन्हा अकरा नंबर शाळेच्या मैदानावरच जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्याचा घाट घालण्यात आला असून, याला नागरिकांतून तीव्र विरोध होत आहे.

तासगाव नगरपालिकेच्या शहरात विविध ठिकाणी १६ शाळा आहेत. तासगाव शहरातील अनेक पिढ्या या पालिकेच्या शाळांतून तयार झालेल्या आहेत. बदलत्या शिक्षणपध्दतीनुसार अलीकडच्या काळात अन्य शाळांसारखीच पालिकेच्या शाळांतील पटसंख्येतदेखील घसरण झाली आहे. पालिकेच्या पटसंख्येची घसरण थांबविण्यासाठी शिक्षण सभापती किशोर गायकवाड यांच्याकडून गेल्या काही वर्षात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. सेमी इंग्रजीदेखील सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकीकडे अपवाद म्हणून अशा गोष्टी सुरु असताना, दुसरीकडे पालिकेच्या शाळांच्या जागा कारभाºयांच्या डोळ्यात घर करून बसलेल्या आहेत. शाळांच्या जागेवर शैक्षणिक उपक्रम राबविण्याऐवजी, या जागा अन्य कारणांचे निमित्त करून ताब्यात घेण्याचा डाव पालिकेच्या कारभाºयांकडून सुरु आहे.

यापूर्वी सिध्देश्वर चौकातील बारा नंबरच्या शाळेची इमारत बांधकाम करताना, त्याठिकाणी व्यापारी संकुल उभारण्याचा घाट घालण्यात आला होता. त्यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी त्याला आक्षेप घेत, न्यायालयीन लढा दिला होता. त्यानंतर मात्र त्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय गुंडाळण्यात आला.

या निर्णयानंतर आता पालिकेच्या अकरा नंबरच्या शाळेच्या मैदानावर जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. अकरा नंबर शाळेची ४८ गुंठे जागा आहे. त्यापैकी तब्बल ३० गुंठे जागा जलशुध्दीकरण प्रकल्पासाठी ताब्यात घेण्याबाबतचा ठराव करण्यात आला आहे. या ठरावाला अनुसरून पालिकेकडून रितसर हरकती मागविण्यात आलेल्या आहेत.

नगरसेवक गप्प
शाळेच्या जागेचा शैक्षणिक उद्देश वगळता, अन्य कोणत्याही कारणासाठी वापर होत असताना, सत्ताधारी व विरोधी गटातील एकाही नगरसेवकाने याबाबत शब्दही काढला नाही. या शाळेच्या परिसरातील नागरिकांनी मात्र शाळेच्या जागेवर जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यास विरोध केला आहे. त्यामुळे येणाºया काळात शाळेच्या जागांचे भवितव्य काय? असाही प्रश्न कारभाºयांच्या या निर्णयामुळे उपस्थित झाला आहे.

तासगाव नगरपालिकेच्या शाळा क्रमांक ११ च्या याच मैदानावर पालिकेचा जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे.


Web Title: The staff eye at school premises at Tasgaon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.