जतमध्ये अतिक्रमण हटाववेळी दगडफेक
By Admin | Updated: June 29, 2014 00:38 IST2014-06-29T00:33:24+5:302014-06-29T00:38:31+5:30
पोलिसांना धक्काबुक्की : महिलेने पोलीस अधिकाऱ्याच्या श्रीमुखात भडकावली!; महिलेसह ९ अटकेत

जतमध्ये अतिक्रमण हटाववेळी दगडफेक
जत : जत शहरातील विजापूर-गुहागर राज्यमार्गावरील अतिक्रमण काढत असताना बसस्थानक परिसरातील हातगाडीवाले आणि पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यात आज (शनिवारी) दुपारी एकच्या दरम्यान बाचाबाची झाली. यावेळी एका व्यावसायिक महिलेने प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना धक्काबुक्की करून त्यांच्या श्रीमुखात लगावली. जमावाने वाहने आणि दुकानांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.
या घटनेमुळे शहरातील वातावरण काहीवेळ तणावपूर्ण झाले होते. राज्य राखीव पोलीस दलाच्या नियंत्रणाखाली रात्री उशिरापर्यंत अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू होती. याप्रकरणी पोलिसांनी नऊजणांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
जत शहरातील व्यावसायिकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घ्यावे, अशी दवंडी सार्वजनिक बांधकाम विभागाने ध्वनिक्षेपकावरून शुक्रवारी दिली होती. शनिवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम. आर. गायकवाड व पी. बी. माने यांनी निगडी कॉर्नरपासून जेसीबीच्या मदतीने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. दुपारी एकच्यादरम्यान अतिक्रमणविरोधी मोहीम बसस्थानक परिसरात आली असता, तेथील हातगाडी व्यावसायिकांनी अतिक्रमण काढण्यास विरोध केला. यावेळी राणूबाई ऊर्फ राणी साळे (वय ३८, रा. जत) या महिलेने प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांचा शर्ट धरत धक्काबुक्की करून त्यांच्या श्रीमुखात लगावली. त्यानंतर येथे तणाव निर्माण झाला. अतिक्रमण काढण्यास विरोध केल्याच्या कारणावरून गौतम ऐवळे, प्रशांत पाथरूट, रूपेश पिसाळ, शिवानंद माळी, दयानंद ऐवळे, रोहित जाधव, पवन कोळी, राहुल बामणे, राणूबाई ऊर्फ राणी साळे (सर्व रा. जत) यांना जत पोलिसांनी अटक केली आहे. या नऊ संशयितांना जत पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गौतम ऐवळे समर्थक कार्यकर्ते व इतर व्यावसायिकांनी महाराणा प्रताप चौक ते जयहिंद चौक दरम्यानच्या रस्त्यालगत असलेली वाहने आणि दुकानांवर दगडफेक केली. यामध्ये हेशी दुग्धालयासमोर उभी असलेल्या रिक्षाची (एमएच १० एक्यू ९९६५) समोरील काच फुटली आहे. अफवा पसरवून दंगल माजवणाऱ्या अज्ञातांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी येथील व्यापाऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार दीपक वजाळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी पंडित पाटील, शिवसेना कार्यकर्ते विजय चव्हाण यांनी एसटी बसस्थानक परिसरातील नागरिक, व्यापारी, व्यावसायिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. काही व्यावसायिक व कार्यकर्त्यांनी मंगळवार पेठेतील दुकानांवर दगडफेक केल्यानंतर व्यापाऱ्यांनी भीतीपोटी दुकाने पटापट बंद केली. (वार्ताहर)