ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी सुसाट; मुक्कामी १५६ गाड्या कधी सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:54 IST2021-09-02T04:54:58+5:302021-09-02T04:54:58+5:30
सांगली : जत, आटपाडी, विटा, इस्लामपूरसह पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी मार्गावरील बसेस फुल चालू आहेत; पण जिल्ह्यासह अन्य शहरांत मुक्कामी ...

ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटी सुसाट; मुक्कामी १५६ गाड्या कधी सुरू होणार?
सांगली : जत, आटपाडी, विटा, इस्लामपूरसह पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी मार्गावरील बसेस फुल चालू आहेत; पण जिल्ह्यासह अन्य शहरांत मुक्कामी जाणाऱ्या २९३ बसेस पैकी १५६ बसेस बंदच आहेत. शाळा बंद असल्यामुळे प्रवाशीच नसल्यामुळे एसटी महामंडळाचा तोटा लक्षात घेऊन मुक्कामी बसेस बंद ठेवल्या आहेत.
कोरोनामुळे दीड वर्षापासून एसटीची प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली आहे, ती अद्याप सुरळीत झाली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांचा महिन्याला पगार होत नाही. अनेक हंगामी कर्मचारी मोलमजुरी करून आपल्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवत आहेत. सध्या कोरोनाचे संकट काही प्रमाणात कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील ७२५ बसेसपैकी ६० टक्के बसेसची प्रवासी वाहतूक सुरळीत झाली आहे; पण उर्वरित ४० टक्के बसेस आजही आगारातच लावून आहेत.
चौकट
मुक्कामाची गाडी येत नसल्याने त्रास
आम्हाला ग्रामीण भागामध्ये एसटीशिवाय दुसरे प्रवासाचे कोणतेही साधन नाही. हक्काची एसटी गावात मुक्कामाला आल्यानंतर कामासाठी शहरात जाणे, औषधोपचारासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे सोयीचे होते; पण मुक्कामी एसटी बंद झाल्यामुळे आमची गैरसोय होत आहे.
-महादेव पाटील, प्रवासी
कोट
खासगी प्रवासी वाहतूक बंद करून एसटीची वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले पाहिजेत. सर्वसामान्यांची एसटी वाचणार आहे. एसटी हे हक्काचे प्रवासी वाहतुकीचे साधन असल्यामुळे ते सुरळीत चालू राहिले पाहिजे. आमच्या गावातील मुक्कामाची बस दीड वर्षापासून बंद आहे.
-विष्णू कांबळे, प्रवासी
चौकट
ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्यांतही जागा मिळेना
सांगली ते आटपाडी, विटा, जत, कवठेमहांकाळ मार्गावरील बसेसला प्रवाशांची गर्दी आहे. यामुळे एसटीच्या बसेसना काही प्रमाणात डिझेलचा खर्च भागविण्यातील अडचण दूर झाली आहे; पण एसटीच्या मुक्कामी बसेसना प्रवासी नाहीत. प्रति किलोमीटर डिझेलचा खर्च २५ रुपये असून, नऊच रुपये मिळत आहेत. किलोमीटरला एसटीला १६ रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
कोट
शाळा बंद असल्यामुळे मुक्कामी बसेस चालत नाहीत, म्हणूनच सुरू केल्या नाहीत. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्यानंतर लगेच बंद असलेल्या मुक्कामी बसेस सुरू करणार आहे.
-दीपक हेतंबे, आगार प्रमुख, सांगली
चौकट
शहरी भागात जाणाऱ्या गाड्या फुल
-सांगली ते विटा मार्गावरील बसेसला ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी आहे. येथील बसमध्ये सध्या फुल गर्दी दिसत आहे.
-सांगली ते आटपाडी, जत, इचलकरंजी मार्गावरील बसेसलाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.