बेफिकीर तरुणांमुळे वाळव्यात कोरोनाचा प्रसार वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:25 IST2021-05-23T04:25:34+5:302021-05-23T04:25:34+5:30
वाळवा : वाळवा येथे दिवसरात्र मोकाट फिरणाऱ्या मोटारसायकलींवरील तरुणांवर कारवाई करण्याची गरज आहे. काही जण विनामास्क फिरत असतात. हेच ...

बेफिकीर तरुणांमुळे वाळव्यात कोरोनाचा प्रसार वाढला
वाळवा : वाळवा येथे दिवसरात्र मोकाट फिरणाऱ्या मोटारसायकलींवरील तरुणांवर कारवाई करण्याची गरज आहे. काही जण विनामास्क फिरत असतात. हेच वाळवा येथील कोरोना रुग्णवाढीचे कारण आहे. परंतु, हे मोकाट गल्लीबोळांतून पोलिसांची नजर चुकवून सुसाट पळत आहेत. दुसऱ्या बाजूला शेतातून काम करून येणारे पोलिसांच्या कारवाईत सापडत आहेत.
घोळक्याने फिरत असूनही पोलिसांच्या हाताला दंडात्मक कारवाईला सापडत नाहीत.
याउलट जे रानांमाळांत काबाडकष्ट करायला जातात, त्यांंच्यावर हुतात्मा चौकात पोलीस कारवाई करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मोडला म्हणून दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. कोटभाग येथील शेतकऱ्यांची जमीन अहिरवाडी, पडवळवाडी, खेड, इस्लामपूर, साखराळे रस्त्यावर असेल तर त्यांनी शेताकडे जायचे नाही काय? त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्हाधिकारी आदेश काय? शेतात जाऊ नये, असा आहे काय, अशी खंत शेतकरी व्यक्त करीत आहेत. रोज शेताकडे जावे लागते, मग रोज पाचशे रुपयांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जायचे का, मास्क नसेल किंवा मास्क शासकीय नियमानुसार घातला नसेल तर जरूर दंडात्मक कारवाई करावी, असे म्हणतात. पोलीस हुतात्मा चौक सोडून इतर कुठेही जात नाहीत. त्यामुळे गावात काय चालले आहे, हे त्यांना कळू शकत नाही. तेव्हा चोर सोडून संन्याशाला फाशी हे आता पोलिसांनी थांबवावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.