यात्रांवरील खर्च आरोग्य सुविधांवर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:27 IST2021-05-09T04:27:44+5:302021-05-09T04:27:44+5:30
सांगली : कोरोनामुळे सर्व यात्रांवर बंदी आहे. त्यामुळे प्रत्येकवर्षी ग्रामदैवतांच्या यात्रांवर होणार खर्च वर्गणी गोळा करून आरोग्य सुविधांसाठी खर्च ...

यात्रांवरील खर्च आरोग्य सुविधांवर करा
सांगली : कोरोनामुळे सर्व यात्रांवर बंदी आहे. त्यामुळे प्रत्येकवर्षी ग्रामदैवतांच्या यात्रांवर होणार खर्च वर्गणी गोळा करून आरोग्य सुविधांसाठी खर्च करावा, तालुका पातळीवरील शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर किंवा कोणतीही रुग्णपयोगी वस्तू आदींची मदत करावी, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी केले आहे.
प्राजक्ता कोरे म्हणाल्या की, आपण सर्व आता पाहतच आहोत. समाजातील बराच वर्ग असा आहे की, पैसे नसल्यामुळे आपला प्राण गमावत आहेत. अशा नैसर्गिक संकटावेळी एकत्रित येऊन लढायची आपली परंपरा आहे. अनेक संकटे आपण एकीच्या बळावर पेलली आहेत. याहीवेळी अशाच विचारांची व कृतीची गरज आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रत्येक गावातील ग्रामदैवत यात्रा रद्द झाल्या आहेत. तरीही सर्व गावकऱ्यांनी यात्रांच्या पार्श्वभूमीवर वर्गणी कमीत कमी शंभर रुपये ग्रामदेवतेच्या नावाने गोळा करून प्रत्येक तालुक्याच्या सरकारी रुग्णालयास ग्रामदेवतेच्या नावाने साहित्य देण्याची गरज आहे. ऑक्सिजन सिलिंडर, व्हेंटिलेटर किंवा कोणतीही रुग्णपयोगी वस्तू दिल्या, तर आपल्या गावाचे नाव पण होईल. कोरोनासारख्या आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये सर्वांनी खारीचा वाटा उचलल्याचे समाधान पण होईल. हे राष्ट्र कार्य समजून प्रत्येक गावाने याचा आवर्जून विचार करावा. इतरानांही प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.