रयत पॅनलला आधार जाणत्या नेत्यांच्या भाषणांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:50 IST2021-03-04T04:50:35+5:302021-03-04T04:50:35+5:30
अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याच्या पार्श्वभूमीवर रयत पॅनलचे प्रमुख, माजी अध्यक्ष डॉ. ...

रयत पॅनलला आधार जाणत्या नेत्यांच्या भाषणांचा
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याच्या पार्श्वभूमीवर रयत पॅनलचे प्रमुख, माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी प्रचारासाठी जाणत्या नेत्यांच्या भाषणांचा आधार घेतला आहे. यशवंतराव मोहिते यांच्या वैचारिक भूमिकेवर वाटचाल स्पष्ट करीत शरद पवार, दिवंगत पतंगराव कदम आणि जयंत पाटील यांनी केलेल्या कौतुकाची चित्रफीत प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे.
यशवंतराव मोहिते यांच्या विचाराने कृष्णा कारखाना चालला, त्यावेळी औद्योगिक स्थैर्य, गतिमान प्रगती होती. त्याच विचाराने आपणही कारखाना चालवत असल्यामुळे कारखान्याचा लौकिक वाढला. याबाबत शरद पवार, पतंगराव कदम आणि जयंत पाटील यांनी कौतुक केल्याच्या चित्रफिती डॉ. इंद्रजित मोहिते यांनी फेसबुकवरून प्रसारित केल्या आहेत.
मागील निवडणुकीत रयत पॅनलचा प्रचार करण्यासाठी तत्कालीन मंत्री पतंगराव कदम यांनी कार्यकर्त्यांना बजावले होते, तर साखर कारखानदारीत डॉ. मोहिते यांची अभ्यासू वृत्ती असल्याने त्यांच्या हातात सहकाराचे नेतृत्व दिले पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले होते. सहवीज प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी जयंत पाटील यांनी डॉ. मोहिते यांचे तोंडभरून कौतुक केले होते. कृष्णा कारखाना आपला आहे, असे समजूनच ऊस उत्पादक कारखान्याकडे ऊस पाठवितात. डॉ. मोहिते मुळापर्यंत जाऊन निर्णय घेतात. मूलभूत प्रश्न सोडविताना खोलवर विचार करण्याची त्यांची प्रवृत्ती आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले होते. या सर्व चित्रफिती रयत पॅनलने प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे.
चाैकट
वाळवा, कडेगाववर लक्ष
डॉ. इंद्रजित मोहिते यांनी पतंगराव कदम आणि जयंत पाटील यांच्या या चित्रिफतींद्वारे वाळवा आणि कडेगाव तालुक्यांतील ऊस उत्पादक सभासद आपल्याकडे खेचण्याची खेळी खेळली आहे.