स्पेशल ट्रेनचे भाडेदेखील स्पेशलच, प्रवाशांना नाहक भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST2021-02-05T07:32:36+5:302021-02-05T07:32:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोना काळात रेल्वे प्रवासावरील निर्बंध प्रवाशांच्या चांगलेच अंगलट येत आहेत. मागणी असणाऱ्या मार्गांवर गाड्या ...

स्पेशल ट्रेनचे भाडेदेखील स्पेशलच, प्रवाशांना नाहक भुर्दंड
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना काळात रेल्वे प्रवासावरील निर्बंध प्रवाशांच्या चांगलेच अंगलट येत आहेत. मागणी असणाऱ्या मार्गांवर गाड्या सुरू झालेल्या नाहीत, शिवाय सुरू असणाऱ्या मोजक्याच गाड्यांचे भाडेही भरमसाट वाढविले आहे.
कोविड स्पेशल ट्रेनच्या नावाखाली प्रवाशांना शंभर रुपयांपर्यंत जादा पैसे मोजावे लागत आहेत. प्रवास तोच, गाडीचा दर्जा तोच, आसनसुविधा त्याच आणि प्रवासासाठी लागणारी वेळदेखील तीच, तरीही भाडे मात्र जवळजवळ दुप्पट... अशा कोंडीत प्रवासी सापडले आहेत. सर्वाधिक गर्दीच्या मिरज जंक्शनमधून एरवी चोवीस तासात ६२ गाड्या ये-जा करायच्या. सध्या लॉकडाऊन बऱ्यापैकी शिथिल झाले तरी, त्या पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. दिवसभरात फक्त नऊ गाड्यांची ये-जा सुरू आहे.
गोवा-निजामुद्दीन, हुबळी-लोकमान्य टिळक टर्मीनस (कुर्ला), म्हैसूर-अजमेर, यशवंतपूर-अजमेर, कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस, कोल्हापूर-गोंदीया महाराष्ट्र एक्सप्रेस, बेंगलुरू-जोधपूर, गोवा-निजामुद्दीन हमसफर एक्स्प्रेस आणि कोल्हापूर-बेंगलुरू राणी चन्नम्मा एक्स्प्रेस सध्या सुरू आहेत. कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस आणि कोेल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस १ फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. या सर्व गाड्या नेहमीच्याच असल्या तरी, लॉकडाऊन काळात स्पेशल म्हणून त्या धावत आहेत. त्यांच्या क्रमांकासमोर शून्य आकडा लावला आहे. त्या कधीही बंद करण्याचा अधिकार रेल्वेकडे राहतो.
चौकट
एलटीटी एक्स्प्रेससाठी ९५ रुपयांचा भुर्दंड
हुबळी-लोकमान्य टिळक टर्मीनस (कुर्ला) आरक्षित प्रवास २९० रुपयांत व्हायचा. सध्या ही गाडी स्पेशल ट्रेन म्हणून धावू लागताच भाडे ३८५ रुपयांवर नेण्यात आले. प्रवाशांना ९५ रुपयांचा भुर्दंड बसत आहे. पर्यायच नसल्याने तो सोसावा लागत आहे.
चौकट
उर्वरित आठ गाड्यांना स्पेशल दर्जा असला तरी, सुदैवाने त्यांना अतिरिक्त शुल्क लावलेले नाही. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. हुबळी-लोकमान्य टिळक टर्मीनस एक्स्प्रेस १ फेब्रुवारीपासून दादरपर्यंत वाढविली आहे. त्यासाठी जनरलपासून वातानुकूलितपर्यंतच्या सर्व दर्जासाठी सरसकट १५ रुपये भाडेवाढ रेल्वेने केली आहे.
चौकट
- कोरोनापूर्वी ६२ रेल्वे मिरज जंक्शनमधून ये-जा करायच्या.
- आता धावतात फक्त ९ एक्स्प्रेस
कोट
मुंबईसाठी रेल्वेने पुरेशा गाड्या सुरू केल्या नाहीत. रात्रीच्या प्रवासासाठी हुबळी-एलटीटी ही एकमेव गाडी आहे. तिला नेहमीपेक्षा ९५ रुपये जास्त मोजावे लागत आहेत. भाडेवाढीचे कोणतेही समर्थनीय कारण मात्र रेल्वे देत नाही.
- सुधीर भोरे, प्रवासी
कोट
स्पेशल ट्रेनच्या नावाखाली रेल्वेने दर वाढविल्याने प्रवासभाडे खासगी बसइतकेच झाले आहे. त्यामुळे प्रवासी रेल्वेऐवजी लक्झरीतून प्रवासाला प्राधान्य देत आहेत. रेल्वेने प्रवाशांचा विचार करून गाड्या वाढविल्या पाहिजेत, अनावश्यक वाढविलेले भाडेही कमी केले पाहिजे.
- संदीप सूर्यवंशी, प्रवासी
----------------