निकृष्ट बियाणांचा सोयाबीनला फटका
By Admin | Updated: September 7, 2014 23:23 IST2014-09-07T22:00:19+5:302014-09-07T23:23:26+5:30
व्यापाऱ्यांकडूनही लूट : उत्पादनात घट; शेतकरी हवालदिल

निकृष्ट बियाणांचा सोयाबीनला फटका
सोमनाथ डवरी - कसबे डिग्रज --मिरज पश्चिम भागात सोयाबीनची काढणी-मळणी सुरू झाली असून निकृष्ट बियाणांमुळे वाढ खुंटलेल्या सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. पण आर्द्रता, घटलेला दर, वजनातील फरक यासाठी विविध युक्त्या करीत व्यापाऱ्यांकडूनही सोयाबीन उत्पादकांची लूट सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
सोयाबीन बियाणांची कृत्रिम टंचाई करून बियाणे कंपनीने निकृष्ट दर्जाचे बियाणे भरमसाट दराने शेतकऱ्यांच्या गळ्यात मारले. ८०, ९० रुपये किलो बियाणांचा दर होता. त्यामुळे सोयाबीनची वाढच झाली नाही. शेंगांची संख्या अत्यल्प होती. त्यातच महिनाभर पाऊस लांबला. शेतकऱ्यांनी रात्रंदिवस पाणी पाजून सोयाबीन जगविले. रोग, किडीकरिता आणि वाढीकरिता खते, औषधांचा हजारोंचा खर्च शेतकऱ्यांनी केला. पण निकृष्ट बियाणांमुळे पिकांची वाढच झाली नाही.
सध्याचा पावसाचा बेत टाळून सोयाबीन काढणी, मळणी सुरू आहे. मात्र उत्पादन निमपटीपेक्षाही घटलेले आहे. सोयाबीनचे दाणे बारीक आहेत. त्यामुळे प्रतिएकरी उतारा १२ ते १४ क्विंटलवरून ५-६ क्विंटलपर्यंत घसरला आहे. यामुळे उत्पादक हताश झाला आहे.
सध्या काढणी-मळणीसाठी प्रतिएकरी २५०० ते ३००० आणि प्रतिपोते मळणी १००-२५० रुपये असा एकरी ५ हजार रुपये खर्च येत आहे. हा खर्च उत्पादकांना परवडणारा नाही.
पंधरवड्यापूर्वी ३ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल १० मॉयश्चरसाठी असलेला दर सध्या व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात खाली आणला आहे. सध्या हा दर ३ हजार रुपयांपर्यंत घसरला आहे. मॉयश्चरच्या प्रमाणात हा दर २२०० ते २४०० पर्यंत पाडला जात आहे. ज्याप्रमाणे मॉयश्चरच्या प्रमाणात फसवणूक होते, त्याचप्रमाणे वजनातही काटामारी काही ठिकाणी होत आहे. यामुळे पुन्हा शेतकऱ्यांची दुहेरी लूट होत आहे.
काढणी-मळणीसाठी प्रतिएकरी पाच हजार रुपये खर्च न परवडणारा.
व्यापारी वर्गाकडून आर्र्द्रतेच्या प्रमाणात सोयाबीनचा दर २२०० ते २४०० पर्यंत खाली आणून उत्पादकाची पिळवणूक.
काही ठिकाणी वजनातही काटामारी.
पाऊस लांबल्याने निकृष्ट बियाणांमुळे वाढीवर परिणाम.
योग्यरितीने वाढ न झाल्याने प्रतिएकरी उताऱ्याची १२ ते १४ वरून ५ ते ६ क्विंटलपर्यंत घसरण