शेतकऱ्यांना निकृष्ट सोयाबीनचा फटका
By Admin | Updated: August 11, 2014 22:42 IST2014-08-11T22:10:59+5:302014-08-11T22:42:29+5:30
मिरज पश्चिम भागातील चित्र : बियाणांमुळे नुकसान

शेतकऱ्यांना निकृष्ट सोयाबीनचा फटका
सोमनाथ डवरी - कसबे डिग्रज - मिरज पश्चिम भागातील कसबे डिग्रज, मौजे डिग्रज, कवठेपिरान, समडोळी, तुंग येथील सुमारे ९०० शेतकऱ्यांना निकृष्ट सोयाबीन बियाणाचा फटका बसला आहे.
यावर्षी सोयाबीन बियाणांची कृत्रिम टंचाई निर्माण करून काही कंपन्यांनी आकर्षक बॅगेत निकृष्ट सोयाबीन भरून त्याची भरमसाट दराने विक्री केली. मात्र या सोयाबीनची उगवण क्षमता कमी असून वाढ कमी आहे. या निकृष्ट बियाणांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कंपनीच्या प्रतिनिधींकडे, विक्रेत्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
मिरज पश्चिम भागात यावर्षी सुमारे तीन हजार एकर सोयाबीन आहे. पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांनी कष्टाने रात्री-अपरात्री जागरण करून पाणी देऊन वारंवार औषध फवारणी केली. परिसरात एका कंपनीने ६०० बॅगा सोयाबीन बियाणे भरमसाट दराने विकले आहे. या सोयाबीनची वाढ तोकडी आहे. इतर सोयाबीनच्या तुलनेत आणि प्रतिवर्षाप्रमाणे उत्पादनाच्या मानाने यावर्षी या कंपनीच्या पिकांची वाढ अत्यंत तोकडी आहे. या सोयाबीनची ८-१० इंचच वाढ दिसते. इतर पिके २४ इंचापेक्षा जादा वाढली आहेत. या सोयाबीनला वाढ नसल्याने शेंगांची संख्या अत्यंत कमी आहे.
कंपनीचे प्रतिनिधी आणि विक्रेत्यांना ही वाढ खुंटलेली बाब, लवकर परिपक्वता, शेंगांची कमी संख्या दाखविली असता, त्यांनी भेट टाळून थातूरमातूर उत्तरे दिली. कोणाकडे तक्रार करणार असाल तर करा, आमची कंपनी मोठी आहे, अशी उडवाउडवी केली जात आहे. या कंपनीचे सुमारे १२०० एकर क्षेत्र आहे. उत्पादन घटल्यामुळे लाखोंचे आर्थिक नुकसान होणार आहे.
याप्रकरणी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी करावी आणि कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. काही शेतकरी ग्राहक न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहेत.