निर्बंध शिथिल होताच रस्ते गर्दीने फुलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:30+5:302021-06-09T04:34:30+5:30
सांगली : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत सोमवारपासून जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊनच्या कडक निर्बंधातून शिथिलता दिली. त्यामुळे सकाळपासून शहरातील मुख्य रस्ते गर्दीने ...

निर्बंध शिथिल होताच रस्ते गर्दीने फुलले
सांगली : ‘ब्रेक द चेन’अंतर्गत सोमवारपासून जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊनच्या कडक निर्बंधातून शिथिलता दिली. त्यामुळे सकाळपासून शहरातील मुख्य रस्ते गर्दीने फुलले होते. बाजारपेठेत भाजीपाला, फळे व इतर साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती. पावसाळ्याच्या तोंडावर खते, बियाणे, औषधांसाठी कृषी सेवा केंद्रासमोर रांगा लागल्या होत्या. कोरोना पूर्ण संपला नसल्याचे भान मात्र नागरिकांना कुठेच नव्हते. बेफिकीर नागरिकांना नियमांना हरताळ फासण्याचा प्रकार आजही सुरू होता.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक लाॅकडाऊन लागू केला. सर्वच दुकाने, भाजी, फळविक्री बंद करण्यात आली. केवळ औषधे, दूध याच सेवा सुरू होत्या. राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत लाॅकडाऊनमधून सवलत दिली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४पर्यंत सुरू करण्यास परवानगी दिली.
त्यामुळे शहरातील मार्केट यार्ड, मारुतीरोड, गणपती पेठ, रिसाला रोडवर भाजीपाला, किराणा साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी होती. वखार भागात कृषी सेवा केंद्रासमोरही शेतकऱ्यांनी रांगा लावल्या होत्या. मान्सूनची चाहूल लागल्याने बियाणे, खतांची खरेदी जोमाने सुरू होती. फळविक्रेत्यांनी पुन्हा रस्त्यावर ठाण मांडले आहे. हातगाड्यावरही नागरिकांची गर्दी होती. मैदाने, उद्यानेही उघडण्यात आली होती. कुठेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नव्हते. बाजारपेठेतील सर्वच रस्ते गर्दीने फुलले होते.
चौकट
बहुतांश दुकाने ‘अनलाॅक’
जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर दुकाने सुरू करण्यास प्रतिबंध आहे. तरीही बाजारपेठेतील बहुतांश दुकाने अनलाॅक होती. होजिअरीपासून ते कपड्याच्या दुकानापर्यंत साऱ्यांनी व्यवसाय सुरू केला होता. काही मोबाइल विक्रीची दुकानेही उघडली होती. महापालिका व पोलीस ठाण्यासमोरील मित्रमंडळ चौकात तर किरकोळ कापड व्यापाऱ्यांनी हातगाड्यावरच व्यवसाय सुरू केला होता. काही व्यापाऱ्यांनी अत्यावश्यक सेवेत नसतानाही दुकाने सुरू केली होती.
चौकट
पोलिसांकडून सुटकेचा श्वास
लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध चौकांत पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हे पोलीस रस्त्यावर आहेत. चौकाचौकांत बॅरिकेड्सही लावण्यात आली आहेत. आता निर्बंध शिथिल झाल्याने पोलिसांनी थोडा सुटकेचा श्वास टाकला होता. सकाळी फारसा बंदोबस्त नव्हता. दुपारनंतर मात्र पुन्हा पोलीस कर्मचारी कर्तत्वावर हजर होते.