अनलॉक होताच जीएसटीचा महसूल वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:30 IST2021-09-05T04:30:16+5:302021-09-05T04:30:16+5:30
सांगली : अनलॉक होताच जिल्ह्यातील जीएसटी करसंकलनात वाढ होताना दिसत आहेत. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या काळात तब्बल ...

अनलॉक होताच जीएसटीचा महसूल वाढला
सांगली : अनलॉक होताच जिल्ह्यातील जीएसटी करसंकलनात वाढ होताना दिसत आहेत. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांच्या काळात तब्बल ३४७ कोटी रुपयांचा जीएसटी गोळा झाला असून मागील वर्षाच्या पाच महिन्यांपेक्षा यंदाची वाढ ही तब्बल ३० टक्के आहे.
जिल्ह्यात डिसेंबर २०२० पासून सुरू झालेला जीएसटी वाढीचा ट्रेंड कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जून २०२१ मध्ये खंडित झाला होता. तो पुन्हा सावरला आहे. सांगली जिल्ह्याच्या ऑगस्टच्या जीएसटी संकलनात मागील ऑगस्टच्या तुलनेने ८ टक्के वाढ नोंदली आहे.
मागील वर्षी एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत जीएसटीचे २६७ कोटी ५६ लाख इतके संकलन झाले होते. यंदा ३४७ कोटींवर वसुली झाली आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात ६८ कोटींचा जीएसटी जमा झाला होता, तर यंदा ऑगस्टमध्ये ७३ कोटी १६ लाख रुपये जीएसटी संकलन झाले आहे.
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात हळूहळू अनलॉकमुळे उद्योग, व्यवसाय, सेवा पूर्ववत होत होते. तसेच एप्रिल, मे, जूनमध्ये कर भरणा करण्यास मुदत वाढ दिली होती. त्यामुळे प्रलंबित कर ऑगस्ट २०२० मध्ये भरला गेला. मात्र, यावर्षी कोरोनाची लाट कमी होतानाच महापुराने जनजीवन विस्कळीत केले. तरीही एप्रिल ते ऑगस्ट या काळात नियमित कर भरणा झाल्याने ऑगस्ट महिन्यात महसुलात मागील वर्षीपेक्षा वाढ दिसत आहे.
गेल्या काही महिन्यांत जीएसटी महसुलात सातत्याने सुधारणा दिसत आहे. अर्थव्यवस्थेत पुन्हा उभारीचे हे लक्षण असून कर प्रशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात आले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने विवरण पत्र भरण्यासाठी मुदत वाढ दिली होती, व्याजात सवलत दिली होती. तसेच प्रलंबित विवरणपत्र यासाठीही अभय योजना आणली आहे. ती ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत लागू आहे. यामुळे प्रलंबित विवरण पत्रे वाढीव मुदतीत भरल्यावर आगामी काळातील महसुलात वृद्धी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.