‘सोनहिरा’ची स्वच्छता ३० लाखात फत्ते

By Admin | Updated: February 9, 2015 01:14 IST2015-02-09T01:13:22+5:302015-02-09T01:14:18+5:30

यांत्रिकी विभागाचे कौशल्य : खातेअंतर्गत कामामुळेच कोट्यवधीची बचत

'Sonihira's cleanliness costs 30 lakhs | ‘सोनहिरा’ची स्वच्छता ३० लाखात फत्ते

‘सोनहिरा’ची स्वच्छता ३० लाखात फत्ते

प्रताप महाडिक- कडेगाव -कडेगाव तालुक्यातील सोनहिरा ओढ्याची स्वच्छता करण्यासाठी बाजारमूल्याप्रमाणे १ कोटी ५० लाख रुपये खर्च येत होता. इतका मोठा निधी मिळणे अशक्य असल्याने गतवर्षी तत्कालीन पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी ‘नावीन्यपूर्ण योजना’ म्हणून ५० लाखांचा निधी मंजूर करीत हे काम शासनाच्या जलसंपदा विभागाकडे सोपविले. जलसंपदा विभागाने त्यांच्याकडील यांत्रिकी विभाग कोल्हापूर यांच्यामार्फत हे काम ५० टक्के दराने केले. आता सोनहिरा स्वच्छता मोहीम पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात आहेत. आतापर्यंत केवळ २० लाख रुपये खर्च आला आहे. यापुढे १० लाख रुपये खर्च होईल. केवळ ३० लाखांच्या खर्चात १ कोटी ५० लाख खर्चाचे काम पूर्ण होत आहे. खातेअंतर्गत काम दिल्यामुळे शासनाच्या तिजोरीतील १ कोटी २० लाख रुपयांची बचत झाली.
सोनसळ हद्दीतील सोनहिरा ओढ्याच्या उगमस्थानापासून रामापूर हद्दीतील सोनहिरा ओढा, वेरळा नदी संगमापर्यंत २२ कि.मी. लांबीच्या ओढ्यात गारवेल आणि काटेरी झाडाझुडपांचे साम्राज्य होते. पाण्याचा प्रवाह थांबला होता. साठून राहिल्यामुळे पाणी दूषित झाले होते. याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत होता. दोन वर्षापूर्वी मोहनराव कदम यांनी श्रमदानातून सोनहिरा स्वच्छता मोहीम सुरू केली. परंतु श्रमदानातून प्रचंड मोठे काम अशक्य होते. त्यानंतर तत्कालीन पालकमंत्री पतंगराव कदम यांनी या कामात लक्ष घातले आणि ५० लाखांच्या निधीतून या कामास प्रारंभ झाला.
यांत्रिकी विभाग कोल्हापूूर येथील पोकलॅन यंत्राच्या साहाय्याने सोनसळ, शिरसगाव, सोनकिरे, चिंचणी, आसद, देवराष्ट्रे, रामापूर आदी गावांच्या हद्दीत सोनहिरा ओढ्याचे पात्र संपूर्ण स्वच्छ केले आहे. आता मोहित्यांचे वडगाव ते देवराष्ट्रे हे साधारणपणे ३ किलोमीटर लांबीचे काम अपूर्ण आहे, तर १९ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी ‘कृष्णाकाठ’ या त्यांच्या जीवनचरित्रात सांगितल्याप्रमाणे सोनहिरा खळखळ वाहत आहे. लहान मुले ओढ्यात पोहण्याचा आनंद घेत आहेत. ताकारी योजनेचे पाणीही सोनहिरा ओढ्यात सोडले आहे. महिला कपडे धुण्यासाठी सोनहिरा काठावर जात आहेत.
यांत्रिकी विभाग कोल्हापूर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोनहिरा काठावरील शेतकऱ्यांशी संवाद साधून कुशलतेने हे काम फत्ते केले. यांत्रिकी विभाग कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता मिलिंद मोरे, कार्यकारी अभियंता जयंत खाडे, उपअभियंता विकास कुचेकर, उपअभियंता पी. आर. चव्हाण यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली यंत्रचालक कुमार गोरंबेकर, तसेच कर्मचाऱ्यांनी हे दर्जेदार व उल्लेखनीय काम केले. याशिवाय याच योजनेत १५ किलोमीटर लांबीचे उपनाले स्वच्छ केले.
चिंचणी येथील बेलगंगा हा उपनाला याच नावीन्यपूर्ण योजनेनुसार बचत झालेल्या २० लाखांच्या खर्चातून करून घ्यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांतून केली आहे.

Web Title: 'Sonihira's cleanliness costs 30 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.