सोनहिरा साखर कारखाना आणखी ३०० रुपये देणार
By Admin | Updated: April 15, 2015 00:28 IST2015-04-15T00:28:42+5:302015-04-15T00:28:42+5:30
पतंगराव कदम : सरकारच्या उपाययोजनांमुळे दिलासा

सोनहिरा साखर कारखाना आणखी ३०० रुपये देणार
वांगी/कडेगाव : शासनाने साखर कारखान्यांना २ हजार कोटींचे बिनव्याजी कर्ज दिले, ऊस खरेदी करमाफी, मळीवरील निर्बंध उठविले आहेत, निर्यात साखरेसाठी अनुदान दिले, केंद्र शासनाने ५० लाख टन साखरेचा बफरस्टॉक केला. या उपाययोजनांमुळे साखर कारखानदारीला दिलासा मिळाला आहे. यामुळे सोनहिरा साखर कारखान्याला आणखी ३०० रुपये ऊसदर देणे शक्य आहे. यापूर्वी ‘सोनहिरा’ने १९०० आणि २०० असा २१०० रुपये पहिला हप्ता दिला आहे, असे कारखान्याचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांनी सांगितले.
वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा कारखान्यावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी आ. कदम म्हणाले की, साखरेचे दर घसरल्यामुळे व अन्य अडचणींमुळे एफआरपीप्रमाणे ऊसदर देणे शक्य नव्हते. याबाबत विधानसभेत अनेकदा चर्चा झाली, परंतु मार्ग निघत नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील आणि साखर कारखानदारीशी संबंधित २५ आमदारांची बैठक झाली. यावेळी आमदारांनी आपल्या समस्या मांडल्या. यामुळे शासनाने वरील उपाययोजना केल्या. आणखी ३०० रुपये ऊसदर देणे शक्य आहे. (वार्ताहर)