पुण्याजवळ सुरू करणार सोनहिरा ग्लोबल युनिव्हर्सिटी
By Admin | Updated: September 5, 2014 23:28 IST2014-09-05T22:58:00+5:302014-09-05T23:28:49+5:30
पतंगराव कदम : नवी मुंबईत वैद्यकीय महाविद्यालय

पुण्याजवळ सुरू करणार सोनहिरा ग्लोबल युनिव्हर्सिटी
कडेगाव : ‘अ’ श्रेणीतील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यापीठ म्हणून भारती विद्यापीठाची ख्याती आहे. कडक शिस्त हे वैशिष्ट्य आहे. अमेरिकेतील भारतीय नागरिकांच्या आग्रहास्तव तेथील संस्थांच्या समन्वयाने २0 शाखा अमेरिकेत सुरू केल्या आहेत. याशिवाय दुबई येथेही शाखा सुरू आहे. नवी मुंबई येथे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयही सुरू करणार आहे. पुणे जिल्ह्यात लवळे येथे ‘सोनहिरा ग्लोबल युनिव्हर्सिटी’ सुरू करणार आहे, असे प्रतिपादन डॉ. पतंगराव कदम यांनी केले.
कडेगाव येथे भारती विद्यापीठाच्या बयाबाई कदम कन्या महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कऱ्हाड, पलूस, कडेगाव व खानापूर तालुक्यातील शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जि. प. सदस्य शांताराम कदम उपस्थित होते.डॉ. कदम म्हणाले की, पानिपतजवळ सोनिपत येथेही भारती विद्यापीठाने शैक्षणिक संकुल सुरू करण्याचा निर्धार केला आहे. शिक्षकी पेशाला व भारती विद्यापीठाच्या नावलौकिकाला साजेसे ‘ज्ञानदानाचे’ काम येथील शिक्षकांनी करावे, असे डॉ. कदम यांनी सांगितले.प्राचार्या सौ. सुलक्षणा कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी श्रीपतराव कदम प्रशाला व ज्यु. कॉलेजचे प्राचार्य पी. व्ही. मोहिते, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एम. सावंत, कऱ्हाड येथील लॉ कॉलेजच्या प्राचार्या पूजा नरवाडकर आदी उपस्थित होते. प्रा. सूर्यकांत बुरुंग यांनी सूत्रसंचालन केले, प्रा. एम. एस. खोत यांनी आभार मानले. (वार्ताहर)
विनोबांपासून प्रेरणा
डॉ. कदम म्हणाले की, मी १९६९ मध्ये आचार्य विनोबा भावे यांना भेटलो. आजची तरुण पिढी अस्वस्थ आहे, यावर उपाय सांगा, अशी त्यांना चिठ्ठी लिहून दिली. त्यावर ‘पटेल ते करावे, पचेल तेच खावे आणि समाजासाठी जगावे’ असे उत्तर त्यांनी दिले. विनोबा भावे यांच्या उत्तरातून मी प्रेरणा घेतली आणि कामास सुरुवात केली.