मालवण : मालवण ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, अन्य सुविधांचा अभाव असे गंभीर प्रश्न घेऊन मालवण तालुका काँग्रेसने स्वातंत्र्यदिनी ग्रामीण रुग्णालयात उपोषण करताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक माने यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेत उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. आठवड्यात डॉ. सोडल, डॉ. शिकलगर हे स्त्रीरोग तज्ञ म्हणून हजर राहतील. यासह रुग्णालयातील रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील, या लेखी आश्वासनानंतर काँग्रेसने अखेर उपोषण मागे घेतले. दहा दिवसांपूर्वी मालवण येथील पंचायत समितीच्या मासिक सभेत देवानंद चिंदरकर यांनी ग्रामीण रुग्णालयातील समस्येबाबत उपोषण छेडण्याचा इशारा दिला होता. याला काँग्रेस पक्षाने पाठींबा देत आज ग्रामीण रुग्णालयात उपोषण छेडले. विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात आले. यावेळी मालवणच्या सभापती सीमा परुळेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष मंदार केणी, जिल्हा परिषद सदस्या संजीवनी लुडबे, नगरसेविका महानंदा खानोलकर, ममता वराडकर, संजय लुडबे, उदय परब, आबा हडकर, सुर्यकांत फणसेकर, जयमाला मयेकर, मोहन केळुसकर, अशोक चव्हाण, पपन मेथर, उमेश मांजरेकर, अनिल तेरसे, विजय चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)अन्यथा काँग्रेसचे पुन्हा आंदोलनग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेश पांचाळ यांची भेट घेऊन गटविकास अधिकारी तथा रुग्णकल्याण समिती अध्यक्ष राजेंद्र पराडकर यांनी समस्या जाणून घेतल्या. आपल्या स्तरावरील समस्या सोडवण्याबाबत आदेश दिले. दरम्यान, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा अतिरिक्त शल्य चिकित्सक श्री. माने यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. आठवड्यातील तीन वार डॉ. सोडल मालवण रुग्णालयात येतीन. तर अन्य वार डॉक्टर शिकलगर हजर राहतील. असुविधा दूर करून रुग्णांची गरसोय होऊ देणार नाही असे लेखी पत्र दिले. मात्र, गरीब, गरजू रुग्णांना प्रसुतीबाबत ग्रामीण रुग्णालयातील सेवेअभावी खासगी दवाखान्यात हजारो रुपये मोजावे लागतात. रुग्णवाहिका व अन्य सुविधाही वेळेवर मिळत नाहीत. यासर्व समस्या सोडवल्या गेल्या पाहिजेत. अन्यथा काँग्रेस पुन्हा आंदोलन छेडेल असा इशारा त्यांनी दिला.
रुग्णालयातील समस्या सोडवणार
By admin | Updated: August 16, 2015 23:45 IST