घनकचऱ्याची पूर्वपात्रता निविदा उघडली

By Admin | Updated: October 4, 2015 23:46 IST2015-10-04T22:33:29+5:302015-10-04T23:46:21+5:30

दोन कंपन्यांची निवड : पुण्यात तज्ज्ञ समितीसमोर पार पडली प्रक्रिया

The solid necbotation tender was opened | घनकचऱ्याची पूर्वपात्रता निविदा उघडली

घनकचऱ्याची पूर्वपात्रता निविदा उघडली

सांगली : घनकचऱ्यावरील प्रक्रियेसाठी मागविण्यात आलेल्या निविदा शनिवारी पुणे येथे उघडण्यात आल्या. यामध्ये दाखल पाचपैकी मुंबईच्या इकोसेव्ह सिस्टिम प्रा. लि. आणि फोरस्ट्रेस या कंपन्यांची निवड करण्यात आली. सर्वात कमी २८ कोटी रुपयांची निविदा इकोसेव्हने भरली आहे. सांगलीच्या शहर सुधार समितीने हरित न्यायालयात घनकचऱ्याच्या प्रश्नावर याचिका दाखल केली होती. त्यानंतर याप्रश्नी हरित न्यायालयाने महापालिकेला प्रकल्पापोटी ६० कोटी रुपये विभागीय आयुक्तांकडे जमा करण्याचे आदेश दिले होते. महापालिकेने यातील २७ कोटी रुपये जमा केले आहेत. पैसे जमा करतानाच निविदा प्रक्रियेसाठीही जोरदार हलाचाली सुरू झाल्या आहेत. पूर्वपात्रता निविदा पुण्यात उघडण्यात आल्या. महापालिकेने आराखडा तयार करण्यासाठी एजन्सी नियुक्तीची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यात पाच निविदा दाखल झाल्या होत्या. त्यातील सर्वाधिक कमी २८ कोटींची निविदा असून, ५०, ५५, १०५ व १५० कोटींच्या आराखड्याच्या निविदा आल्या असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. न्यायालयाने प्रक्रिया पूर्ण करून वर्कआॅर्डर देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुण्यात शनिवारी पूर्वपात्रता निविदा निश्चित करून दोन कंपन्यांची निवड केली आहे. आता स्थायी समिती, महासभेच्या मान्यतेनंतर वर्कआॅर्डर देण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.
समडोळी व बेडग रस्त्यावरील कचरा डेपोला कंपाऊंड भिंत, रस्ते, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. आता केवळ घनकचरा प्रकल्प निश्चित होण्याची प्रतीक्षा आहे. कचऱ्यापासून कंपोस्ट खत व इंधन बनविण्याचा प्रकल्प कंपन्यांनी सादर केला आहे.
निविदा निश्चित करण्यापूर्वी संबंधित कंपन्यांचा पूर्वानुभव, त्याठिकाणच्या प्रकल्पाची यशस्वीता या गोष्टींची शहानिशा केली जाणार आहे. महापालिका क्षेत्रातून दररोज १७० टन कचरा गोळा केला जातो. मोठ्या प्रमाणावर कचरा उपलब्ध असल्याने प्रकल्प राबविण्यासाठी कोणतीही अडचण नाही. (प्रतिनिधी)

अनुभवाचा विचार
इकोसेव्ह कंपनीने यापूर्वी जम्मू-काश्मीर, आंध्रप्रदेश तसेच परदेशातही ४५ ठिकाणी प्रकल्प उभारले आहेत. फोरस्ट्रेस कंपनीने औरंगाबाद, हैदराबाद येथे प्रकल्प सादर केले असले, तरी अद्याप कोणताही प्रकल्प कार्यान्वित झालेला नाही.

Web Title: The solid necbotation tender was opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.