समाजाने पोलीस खात्याच्या पाठीशी उभे रहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST2021-08-27T04:29:13+5:302021-08-27T04:29:13+5:30
कुरळप (ता. वाळवा) येथे ग्रामपंचायत कार्यालयात दीपक जाधव यांचा सत्कार पी. आर.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शोभाताई पाटील, ...

समाजाने पोलीस खात्याच्या पाठीशी उभे रहावे
कुरळप (ता. वाळवा) येथे ग्रामपंचायत कार्यालयात दीपक जाधव यांचा सत्कार पी. आर.पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शोभाताई पाटील, सर्जेराव धनवडे, डी. एल. पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : पोलीस खाते व ग्रामस्थांमधील संवाद व समन्वयातून समाजात कायदा, सुव्यवस्था व शांतता कायम ठेवण्यास अधिक बळकटी येऊ शकते, असा विश्वास राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी व्यक्त केला. ज्यादिवशी पोलीस खाते दुबळे, कमजोर होईल, त्यादिवशी ज्याच्याकडे ताकद, त्याचे राज्य अशी अवस्था होईल. म्हणून समाजातील विविध घटकांनी पोलीस खात्याच्या पाठीशी उभे रहायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.
कुरळप पोलीस ठाण्याला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव यांचा कुरळप ग्रामपंचायत व सर्व संस्थांच्यावतीने पी. आर. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सरपंच शोभाताई पाटील, उपसरपंच सर्जेराव धनवडे उपस्थित होते.
दीपक जाधव म्हणाले की, समाजातील कोणताही नागरिक हक्काने आमच्याकडे तक्रार द्यायला येईल, त्यावेळी आयएसओ मानांकनचे सार्थक होईल. पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आदर करू. पोलीस ठाण्यात येणाऱ्यांना निश्चित बदल जाणवेल.
बाबूराव वायदंडे, नामदेव देवकर, सर्जेराव धनवडे यांनीही मनोगत व्यक्त केले. वाळवा बझारचे उपाध्यक्ष डी. एल. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पी.जी. पाटील, संपत देवकर, संजय गायकवाड, शिवाजी सूर्यवंशी, दीपक पाटील, बाबासो सूर्यवंशी, नागेश जाधव, भगवान पाटील, अशोक देवकर उपस्थित होते. पोपट माळी यांनी आभार मानले.