तासगाव पालिकेसमोर सामाजिक कार्यकर्त्याचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:20 IST2021-06-01T04:20:02+5:302021-06-01T04:20:02+5:30
तासगाव : येथील महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात नगरपालिकेने कोविड सेंटर सुरू केले आहे. तेथे रुग्णांवर नाममात्र दरात उपचार व्हावेत, या ...

तासगाव पालिकेसमोर सामाजिक कार्यकर्त्याचे उपोषण
तासगाव : येथील महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात नगरपालिकेने कोविड सेंटर सुरू केले आहे. तेथे रुग्णांवर नाममात्र दरात उपचार व्हावेत, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल शिंदे यांनी नगरपालिकेसमोर सोमवारी उपोषणास सुरुवात केली. प्रशासनाने मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला आहे.
नगरपालिकेने महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात कोविड हॉस्पिटल सुरू केले आहे. तासगावातील मेडिकल असोसिएशनच्या सहकार्यातून हे हॉस्पिटल सुरू आहे. या हॉस्पिटलला बहुतांशी मशिनरी, व्हेंटिलेटर, बेड देणगीतून मिळाले आहेत. शिवाय पालिकेचे अनेक कर्मचारी या हॉस्पिटलला सेवा बजावत आहेत.
कोरोनाचे महागडे उपचार घेणे रुग्णांना परवडत नाही. सततच्या लॉकडाऊनमुळे लोकांची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. त्यामुळे येथील रुग्णांना नाममात्र दरात उपचार देणे, ही पालिकेची जबाबदारी आहे. मात्र पालिका जबाबदारी झटकत आहे, असा आरोप करून शिंदे यांनी मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांना निवेदन दिले होते.
रुग्णांवर नाममात्र दरात उपचार करावेत, अशी मागणी या निवेदनात केली होती. मात्र गेल्या आठवडाभरात पालिका प्रशासनाने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे पालिकेसमोरच शिंदे यांनी उपोषणास सुरुवात केली आहे. पालिका प्रशासनाने मागणी मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा शिंदे यांनी दिला आहे.