‘सोशल मीडिया’वर चोरांच्या अफवांचा बाजार!
By Admin | Updated: August 4, 2015 23:37 IST2015-08-04T23:37:21+5:302015-08-04T23:37:21+5:30
पोलीस हैराण : जिल्ह्यात तीन हजार परप्रांतीयांची घुसखोरी झाल्याची चर्चा; गावोगावी गस्त सुरूच

‘सोशल मीडिया’वर चोरांच्या अफवांचा बाजार!
सचिन लाड- सांगली -बिहार, मध्य प्रदेश, गडचिरोली या भागातून सुमारे तीन हजार परप्रांतीयांनी चोऱ्या करण्यासाठी सांगली जिल्ह्यात शिरकाव केल्याची अफवा ‘सोशल मीडिया’वरून पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरांचे वर्णन, त्यांच्याकडील हत्यारांची छायाचित्रेही प्रसारित केली जात आहेत. चोरांना पकडण्यासाठी अनेक दिवसांपासून गावोगावी गस्त सुरू आहे, पण गस्त घालणाऱ्यांना चोरांचे अद्याप दर्शन झालेले नाही. या अफवांमुळे पोलीस त्रस्त आहेत.
चोरटे गावात घुसल्याची चर्चा वाळवा, शिराळा तालुक्यातून सुरू झाली. तेथे गावकऱ्यांची गस्त सुरू झाली. मात्र इस्लामपुरात दोन दिवसांपूर्वी गस्त घालणारे तरुणच चोर निघाले. मग गावकऱ्यांनी आता विश्वास कोणावर ठेवायचा?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात गावोगावी गस्त सुरू आहे. पण ग्रामस्थांना एकही चोर सापडलेला नाही. चोर असल्याच्या संशयावरून विनाकारण काहीजणांना मारहाणीचे प्रकार घडले आहेत. ग्रामस्थांनी पकडलेल्या संशयित चोरांकडे पोलिसांनी चौकशी केली, मात्र ते रात्री कामावरून येणारे किंवा परगावहून आलेले असल्याचे समजले. जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सध्या गावकऱ्यांची रात्री अकरा ते पहाटे पाचपर्यंत गस्त सुरू आहे. त्यांच्या जोडीला पोलीसही रात्रभर जागत आहेत. ‘चोर आलेऽऽ आलेऽऽ...’, म्हणून गावकरी दंगा करतात. चोरांच्या दिशेने पळत जातात. परंतु तेथे कोणीच नसते. ‘अंधारात पळून गेले’, असा सूर काढून गावकरी गप्प बसत आहेत.
ग्रामीण भागातील चोर व गस्तीचे लोण आता शहरापर्यंत आले आहे. गेल्या पंधरवड्यात सांगली शहरात लूटमारीच्या दोन घटना घडल्या. यामध्ये पकडलेले लुटारू सांगलीतील निघाले आहेत. गुरुवारी रात्री हरिपूर, कवठेपिरान व कवलापूर या गावात चोर आल्याची अफवा पसरली. पाठलाग करूनही चोर सापडले नाहीत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलीसही जी माहिती मिळेल, त्यानुसार गावोगावी जाऊन भेट देत आहेत. गावकऱ्यांनी गस्त घालताना दंगा करू नये, त्यांना पकडायचे असेल, तर नियोजनबद्ध आणि शांततेत गस्त घालण्याची गरज आहे.
गस्त सुरू असताना काहीजणांच्या घरावर दगड पडतातच कसे, हा संशोधनाचा विषय बनला आहे. सोशल मीडियावर चोरांचे वर्णन व त्यांच्याकडे असलेले छायाचित्र प्रसारित केले जात आहे.
मित्रांनो, सावधान!
सोशल मीडियावरून प्रसारित झालेल्या संदेशामध्ये असे म्हटले आहे की, विट्यात दोन चोरट्यांना अटक केली आहे. त्यांनी कबूल केले आहे की, आम्ही एक-दोन नसून, तीन हजार आहोत... मध्य प्रदेश, गडचिरोली या भागातून ते आले आहेत. तीन ते चार वर्षांच्या मुलांना ते पळवून नेत आहेत. आपल्या गावात शंकास्पद व्यक्ती वाटल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. गाफील राहू नका. सर्वांना नम्र विनंती की, आपले मोबाईल चार्जिंग करून त्यावर पुरेसा बॅलन्स ठेवावा. जेणेकरून चोर आले तर, एकमेकांच्या मदतीसाठी संपर्क साधता येईल. चोर गावातील विजेचे दिवे बंद करतात. ते दिवसभर पाहणी करून जातात. लहान मुलांवर लक्ष ठेवा. हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवा. हसण्यावारी नेऊ नका...