नेलकरंजी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

By Admin | Updated: June 24, 2014 01:20 IST2014-06-24T00:55:13+5:302014-06-24T01:20:26+5:30

रात्रीत चार गावांत चोऱ्या : दोन लाखांचा ऐवज लंपास

Snooping in the Nellkarni area | नेलकरंजी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

नेलकरंजी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी, मानेवाडी, मेटकरवाडी आणि गोमेवाडी परिसरात काल, रविवारी रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. आटपाडी पोलिसांनी थरारक पाठलाग केला. मात्र, चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. चोरट्यांनी सुमारे दोन लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला.
काल, रविवारी रात्री नेलकरंजी परिसरातील वस्तीवरील दुचाकी चोरून चोरट्यांनी नेलकरंजी गावाकडे मोर्चा वळवला. मध्यरात्री गावातील दामोदर ईश्वरा जावीर यांच्या घरात ते घुसले. पोलिसांनी सांगितले की, जावीर यांच्या घरात चार चोरटे शिरले होते. त्यांच्या हातात धारदार चाकू होता. जावीर यांच्यासह पत्नी छाया, दोन मुले आणि दोन मुली घरात होत्या.
सर्वजण झोपल्याचे पाहून चोरट्यांनी सहा हजार रुपये रोख रकमेसह दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण, पाऊण तोळ्याची बोरमाळ, कानातील झुमके, सोन्याच्या रिंगा, सोन्याचे टॉप्स, अर्धा तोळे वजनाची सोन्याची साखळी आणि दोन मोबाईल असा ऐवज लंपास केला. चोरटे घरात शिरल्याचे जावीर यांच्या उशिरा लक्षात आले. त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला, मात्र ते पसार झाले होते. त्यानंतर चोरट्यांनी मानेवाडी, गोमेवाडी, मेटकरवाडी परिसरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मानेवाडीतील ग्रामस्थांनी आटपाडी पोलीस ठाण्यास संपर्क साधला. पोलीस तातडीने मानेवाडीत पोहोचले. तेव्हा याच परिसरातील चोरलेल्या चार दुचाकी तेथेच टाकून चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलीस उपअधिक्षक डॉ. अभिजित पाटील यांनी आज घटनास्थळी भेट दिली. (वार्ताहर)

Web Title: Snooping in the Nellkarni area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.