चोरट्यांचे लागेबांधे सराफांशी!

By Admin | Updated: February 12, 2015 00:39 IST2015-02-11T23:30:01+5:302015-02-12T00:39:05+5:30

आटपाडी तालुक्यातील प्रकार : पोलीस तपासात स्पष्ट, कठोर कारवाईची मागणी

Snoopgies with apples! | चोरट्यांचे लागेबांधे सराफांशी!

चोरट्यांचे लागेबांधे सराफांशी!

अविनाश बाड- आटपाडीतील चोरटे तालुक्यात चोऱ्या करुन इथल्याच काही सराफांना चोरीचे दागिने विकत असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या या हव्यासापोटी काही सराफांची करोडपती होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. घरफोड्यांवर पोलीस कारवाई करतात, मात्र चोरीचे दागने विकत घेणारे हे ‘बडे चोर’ समाजात उजळ माथ्याने वावरतात. त्यांच्यावर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत चोऱ्या थांबणे कठीण असल्याने, पोलिसांनी अशा सराफांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
आटपाडी तालुका म्हणजे वारंवार भीषण दुष्काळाला सामोरा जाणारा तालुका. या तालुक्यात शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांची दुकाने व्यवस्थित चालत नाहीत. मात्र काही सराफ व्यावसायिकांना कायम तेजीचे दिवस कसे असतात, हे कुणालाही न सुटलेले कोडे आहे.
सोन्यात मिसळल्या जाणाऱ्या पावडरपासून ते चोरीचे दागिने घेण्यापर्यंत इथल्या सराफांबद्दल नागरिकांत नेहमी चर्चा सुरु असते. आलिशान गाड्यांतून फिरणाऱ्या काही तरुणांवर सोन्याच्या पावडरच्या तस्करीचा शिक्का बसला आहे. उदरनिर्वाहासाठी दरवर्षी ४0 ते ५0 हजारजण स्थलांतर करणाऱ्या आटपाडी तालुक्यात होणारा सोन्या-चांदीचा व्यवहार मात्र आश्चर्यचकित करणारा ठरला आहे.
आटपाडी पोलिसांनी पकडलेल्या पाचजणांच्या घरफोडीच्या टोळीतील अटक केलेले अजय राजा पवार (वय १९, रा. आटपाडी) आणि धर्मेंद्र वंगाड्या काळे (२४, रा. विठलापूर) आणि उर्वरित तिघेही संशयित तालुक्यातीलच आहेत. अटक केलेल्या दोघांनी चोरलेला ऐवज आटपाडी आणि तासगावमधील सराफांना विकल्याची माहिती तपासात पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी या सराफांकडून हे दागिनेही हस्तगत केले आहेत. अनेक चोऱ्यांमध्ये अटक केलेले संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीत गेल्यावर पुन्हा जामिनावर बाहेर येतात आणि बाहेर येताच पुन्हा चोऱ्या करतात. पुन्हा ते दागिने विकतात. कधी पोलिसांच्या हाती लागलेच, तर काही चोऱ्या निष्पन्न होतात. पुन्हा तेच ते दुष्टचक्र थांबविण्यासाठी संशयित आरोपींवर कठोर कारवाई तर व्हायलाच पाहिजे. पण त्यांना साथ देऊन आपली घरे भरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करणे, आता वाढते चोऱ्यांचे सत्र पाहता खूप गरजेचे झाले आहे.
या व्यवहारात (?) चोरटे आणि सराफ यांच्यात मध्यस्थी करणाऱ्या दलालांचीही सध्या चलती आहे. चोरीचा मामला असल्याने वाट्टेल त्या दराने आणि वाट्टेल तेवढे वजन सांगून चोरीचे दागिने खरेदी करुन पैसा मिळविला जात आहे. नंतर हे चोरीचे सोने गाळून त्याचे नव्याने दागिने केले जात असल्याची चर्चा आहे.


पोलिसांचेही उखळ पांढरे...
चोरट्यांबरोबरच चोरीचे दागिने घेणाऱ्यांवर, दागिने विक्रीसाठी दलाली करुन चोरट्यांना सहकार्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली, तर चोऱ्या थांबू शकतात. पण पोलीस चोरांवर गुन्हे दाखल करतात, व्यापाऱ्यांकडून ‘माल’ वसूल करतात. गुन्हा दाखल होईल या भीतीने व्यापारीही पोलिसांपुढे खिसा रिकामा करतात. या सगळ्यात चोर आणि पोलीसच फक्त कायम फायद्यात रहात आहेत. अनेक चोऱ्यांतील चोर सापडूनही सगळा ऐवज विशेषत: रोख रक्कम मिळून येतानाही, ही रक्कम कुणाचे खिसे भरते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही आणि त्यामुळे चोऱ्यांचे दुष्टचक्रही थांबत नाही.

अप्रामाणिकपणे चोरीचा माल घेणे किंवा चोरीचा माल माहिती असूनही ठेवून घेणे हा गुन्हा आहे. भारतीय दंडविधान संहिता कलम ४११ नुसार तीन वर्षापर्यंत शिक्षा किंवा दंड, शिक्षा आणि दंड दोन्हीही होऊ शकते.
- अ‍ॅड. धनंजय पाटील
अध्यक्ष, आटपाडी तालुका राष्ट्रवादी वकील संघटना

Web Title: Snoopgies with apples!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.