स्नेहल पाटील की योजना शिंदे?
By Admin | Updated: July 8, 2016 00:55 IST2016-07-08T00:41:34+5:302016-07-08T00:55:01+5:30
जि. प. अध्यक्ष निवड आज

स्नेहल पाटील की योजना शिंदे?
सांगली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी स्नेहल पाटील की योजना शिंदे, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आज, शुक्रवारी सकाळी यावर शिक्कामोर्तब होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी मुंबईत इच्छुकांशी चर्चा केली. जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करून अंतिम झालेल्या नावाचे पाकीट घेऊन मुंबईतून दोन पक्षनिरीक्षक सांगलीत येतील, अशी माहिती पवार यांनी दूरध्वनीवरून दिली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी गेल्या दोन महिन्यांपासून सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. कार्यकाल संपण्यास केवळ आठ महिन्यांचा कालावधी राहिल्याने कमी कालावधीसाठी का होईना पद मिळावे, यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यापूर्वी ठरल्यानुसार तासगाव तालुक्यालाच अध्यक्षपद मिळणार असल्याने या तालुक्यातील स्नेहल पाटील (येळावी), योजना शिंदे (मणेराजुरी) आणि कल्पना सावंत (सावळज) यांची नावे चर्चेत होती. जिल्ह्यातील नेत्यांना नावावर शिक्कामोर्तब करण्यात अडचणी आल्याने गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेतल्या. यावेळी तिन्ही उमेदवारांना मुंबईत स्वतंत्र बोलावून त्यांचे शिक्षण, राजकीय पार्श्वभूमी याबाबत विचारणा केली. आगामी निवडणुका लक्षात घेता संधी मिळाल्यास केवळ मतदारसंघापुरते काम न करता जिल्हाभर काम करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. पवार यांनी एकट्यानेच मुलाखती घेतल्या.
इच्छुकांची संख्या जास्त असल्याने व एकमत होत नसल्याने राष्ट्रवादीने मागील आठवड्यात जिल्हा परिषद सदस्यांचाही कल जाणून घेतला होता. त्यासाठी प्रत्येक सदस्याने मत दिले होते. मुंबईतील मुलाखतीवेळी योजना शिंदे यांनी यावर आक्षेप घेतला. त्यामुळे तिन्ही सदस्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात असेपर्यंत तरी ही ‘मतपेटी’ फोडण्यात आली नव्हती.
दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्यासाठी कॉँग्रेसकडूनही तयारी करण्यात आली असून, राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल, यावर रणनीती ठरविणार असल्याचे पक्षप्रतोद सुरेश मोहिते यांनी सांगितले. त्यादृष्टीने गुरुवारी मोहिते यांच्यासह सम्राट महाडिक, रणधीर नाईक, भीमराव माने यांनी माजी मंत्री पतंगराव कदम यांची भेट घेतली. काँग्रेसकडून मीनाक्षी महाडिक अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
कॉँग्रेसने शुक्रवारी सकाळी दहा वाजता कॉँग्रेसच्या सदस्यांची बैठक आयोजित केली आहे.
शुक्रवारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा बोलाविण्यात आली असून, यातच लाल दिवा कोणाला मिळणार, हे निश्चित होणार आहे. (प्रतिनिधी)
‘तयारी’ होत असेल तरच...
गुरुवारी कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुरेश मोहिते, रणधीर नाईक, सम्राट महाडिक आणि भीमराव माने यांनी माजी मंत्री पतंगराव कदम यांची भेट घेऊन निवडणूक लढविण्याबाबत चर्चा केली. यावर ‘तयारी’ होत असेल तरच निवडणूक लढवा, अन्यथा नको, अशी सूचना कदम यांनी केली आहे, तर सत्ताधारी गटाकडून कोणाचे नाव निश्चित होते, यावर रणनीती ठरविणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.
राष्ट्रवादीच्या बैठकीत समजणार नाव
गुरुवारी मुंबईत अध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील नेत्यांशी चर्चा करून अंतिम नाव पक्षनिरीक्षकांमार्फत पाठविण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले. सत्ताधारी गटाची सकाळी नऊ वाजता राष्ट्रवादी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीतच नाव समजेल, असे सांगण्यात आले.