शिराळ्यात आलाय नाग, कुठे गेला वाघ?
By Admin | Updated: October 21, 2014 00:20 IST2014-10-20T23:55:34+5:302014-10-21T00:20:04+5:30
शिवाजीराव नाईक यांची बाजी

शिराळ्यात आलाय नाग, कुठे गेला वाघ?
विकास शहा - शिराळा -शिराळा मतदारसंघातील वाळवा तालुक्यातून मोठे मताधिक्य घेण्याची जयंतराव पाटील यांची अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे ‘शिराळ्यात नाग आला, मात्र वाघ गेला कोठे’? अशी प्रतिक्रिया उमटत आहे. या निवडणुकीत तीन गट वेगवेगळे लढले. यामध्ये ‘कमळ’ फुलून शिवाजीराव नाईक यांनी पुन्हा आपली ताकद दाखवून दिली. तसेच कॅबिनेट मंत्रीपदाचे ते दावेदार झाले आहेत.
१९९५ पासून शिवाजीराव नाईक यांनी आपली वेगळी चूल मांडली. त्यावेळी पहिल्यांदा फत्तेसिंगराव नाईक यांच्याबरोबर युती करून विजय मिळविला. १९९९ मध्ये हीच परिस्थिती होती. मात्र २00४ मध्ये मानसिंगराव नाईक, सत्यजित देशमुख व शिवाजीराव नाईक हे वेगवेगळे लढले. यामध्ये शिवाजीराव नाईक श्रेष्ठ ठरले. २00९ मध्ये देशमुख—मानसिंगराव नाईक गट एकत्र आले. यामध्ये मानसिंगराव यांनी शिवाजीरावांचा पराभव केला.
यानंतर राजकारणाचे वारे फिरले. लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले यश या विधानसभा निवडणुकीत उपयोगी पडले. आघाडी—युती तुटली. यामुळे सर्वच पक्षांच्या उमेदवारांना आपली ताकद अजमावण्याची संधी मिळाली. सत्यजित देशमुख यांच्यासाठी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी जंग जंग पछाडले. प्रत्येक गावात भेटी दिल्या, फोनवरून मतदारांशी संवाद साधला, तसेच त्यांचा मुक्कामही याच मतदारसंघात राहिला. नारायण राणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हुसेन दलवाई, मुझफ्फर हुसेन यांच्या सभा घेतल्या. तसेच शिवाजीराव नाईक यांनी नितीन गडकरी, स्मृती इराणी या केंद्रीय मंत्र्यांच्या सभा घेतल्या. मानसिंगराव यांच्यासाठी खा. सुप्रिया सुळे, जयंतराव पाटील यांच्या सभा झाल्या. प्रत्येकजण आपापली ताकद खर्च करीत होता. मात्र शिवाजीराव यांनी बाजी मारली. याचबरोबर गडकरी यांनी, ‘शिवाजीरावांना निवडून द्या, त्यांना कॅबिनेट मंत्री करतो’, अशी घोषणा केली होती. त्यामुळे गडकरी यांनी दिलेला शब्द पाळला, तर शिवाजीरावांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची आशा आहे.
मानसिंगरावांसाठी जयंतरावांची शर्थ
जयंतराव पाटील यांनी मानसिंगराव यांना विजयी करण्यासाठी जंगजंग पछाडले होते. त्यांच्या मतदारसंघापेक्षा जास्त सभा, बैठका त्यांनी शिराळा मतदारसंघात घेतल्या होत्या. ‘जयंतराव’ हा वाळव्याचा वाघ, तर शिवाजीराव हे शिराळ्याचा नाग म्हणून संबोधले जातात. शिवाजीराव यांनी बाजी मारल्याने वाळव्याचा वाघ कोठे गेला? या वाघाने ५0 हजारांचे मताधिक्य देण्याचे जाहीर केले होते. ‘नाग आला, मात्र वाघ कुठे गेला?’ अशा प्रतिक्रिया येथे उमटत आहे.