कत्तलखान्याचे बांधकाम थांबविले
By Admin | Updated: December 17, 2015 22:56 IST2015-12-17T22:43:39+5:302015-12-17T22:56:24+5:30
मिरजेत महापौरांची अचानक भेट : ठेकेदाराचे विनापरवाना काम

कत्तलखान्याचे बांधकाम थांबविले
मिरज : महापौर विवेक कांबळे यांनी गुरुवारी मिरजेत महापालिकेच्या बेडग रस्त्यावरील कत्तलखान्यास भेट देऊन, ठेकेदाराने सुरू केलेले विनापरवाना बांधकाम थांबविण्याचे आदेश दिले. जनावरांची कत्तल करणाऱ्या परप्रांतीय कामगारांच्या नोंदी नसल्याने, ठेकेदाराच्या कार्यालयास महापौरांनी टाळे ठोकले.
महापालिकेचा बेडग रस्त्यावरील कत्तलखाना ठेकेदाराकडे चालविण्यास देण्यात आला आहे. कत्तलखान्यात दररोज मोठ्या संख्येने जनावरांची कत्तल करण्यात येते. कत्तलखान्यातील नियमबाह्य कारभाराबाबत तक्रारींमुळे महापौर कांबळे यांनी गुरुवारी सकाळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह अचानक तेथे भेट देऊन पाहणी केली. कत्तलखान्यात जनावरांच्या कातड्याचा साठा करण्यासाठी गोदामाचे बांधकाम करण्यात येत असल्याचे दिसून आले. गोदाम बांधकाम परवानगीसाठी ठेकेदाराने महापालिकेकडे अर्ज केला आहे. मात्र बांधकाम परवानगी अद्याप मिळाली नसतानाही बांधकाम सुरू करण्यात आल्याने महापौरांनी विनापरवाना बांधकाम थांबविण्याचे आदेश दिले. कत्तलखान्यात काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना हातमोजे, बूट अशा कोणत्याही सुविधा नसल्याने महापौरांनी ठेकेदारास जाब विचारला. ठेकेदाराने परप्रांतीय कामगारांच्या नोंदी व कागदपत्रे ठेवली नसल्याने महापौरांनी ठेकेदाराच्या कार्यालयास टाळे ठोकले. कत्तलखान्यात आढळलेल्या त्रुटींची ठेकेदाराकडून पूर्तता करण्याच्या सूचना महापौरांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. (वार्ताहर)
कचरा वर्गीकरण यंत्र
कत्तलखान्यालगत असलेल्या कचरा डेपोत २७ लाख रुपये किमतीचे कचरा वर्गीकरण करणारे यंत्र बसविण्यात येणार आहे. या यंत्राद्वारे ओला, सुका व प्लॅस्टिक असे कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती करता येणार आहे. यासाठी कचरा डेपोत खत प्रकल्प उभारण्यात येत असून अंतर्गत रस्ते करण्यात येत आहेत. हरित न्यायालयाच्या आदेशामुळे कचऱ्याच्या विल्हेवाटीची व्यवस्था करण्यात येत असून, महापौरांनी कचरा वर्गीकरण करणाऱ्या यंत्राची पाहणी केली.