दरीबडचीसह सहा गावांना डेंग्यूचा सर्वाधिक धोका

By Admin | Updated: November 17, 2014 23:21 IST2014-11-17T22:20:38+5:302014-11-17T23:21:17+5:30

डासांची उत्पत्ती अधिक : आरोग्य विभागाचे सर्वेक्षण; नागरिकांत भीतीचे वातावरण

Six villages, including Dariabadi, have the highest risk of dengue | दरीबडचीसह सहा गावांना डेंग्यूचा सर्वाधिक धोका

दरीबडचीसह सहा गावांना डेंग्यूचा सर्वाधिक धोका

दरीबडची : जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जत तालुक्यातील सहा गावे डेंग्यूची सर्वाधिक धोकादायक गावे म्हणून घोषित केली आहेत. त्यामध्ये दरीबडची, तिकोंडी, कुडनूर, डोर्ली, कुंभारी, उमदी या गावांचा समावेश आहे. आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात या गावांमध्ये डासांची उत्पती झाल्याचे आढळून आले आहे. डेंग्यू व चिकुनगुन्या डासांची सर्वाधिक संख्याही आढळून आली आहे. मात्र डेंग्यूच्या गावांकडे आरोग्य विभागाने, ग्रामपंचायतीने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली होती. दमदार पावसामुळे गावासभोवती, स्टॅन्डजवळ, उथळ ठिकाणी पाण्याची डबकी मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहेत. पावसामुळे गावासभोवती, रानामध्ये गवत वाढलेले आहे. गटारीतील पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने गटारी तुंबलेल्या आहेत. गटारीतील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली गेलेली नाही. त्यामुळे अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे.
सध्या गावामध्ये पाणीपुरवठा वेळच्या वेळी केला जात आहे. तरीसुध्दा ग्रामस्थ घरामध्ये, टाकीत, भांड्यात पाणी साठवून ठेवत आहेत. उघड्यावर प्लॅस्टिक बाटल्यांचा पडलेला खच, नारळाच्या करवंट्या, टायर, फ्रीज, कुलरमधील पाणी यामध्ये डासांची उत्पत्ती होते. डासांच्या उत्पत्तीबाबत ग्रामस्थांचे अज्ञान, जनजागृतीचा अभाव, उपाययोजनेविषयी माहिती नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे.
‘जत पूर्व भागात डासांचा वाढता प्रादुर्भाव’ ही बातमी ‘लोकमत’मध्ये दि. २६ आॅक्टोबरला प्रसिध्द झाल्यानंतर दरीबडची येथे आरोग्य विभागाने डासांची घनता, सर्व्हे, तसेच ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीमध्ये माहिती घेऊन कीटकशास्त्र तज्ज्ञांकडून डासांची तपासणी करण्यात आली. यापलीकडे आरोग्य विभागाकडून काहीही केलेले नाही. ग्रामस्थांची जनजागृती, औषध फवारणी, धूर फवारणी करण्यात आली नाही. डासांसंबंधी माहितीपत्रके वाटण्यात आली नाहीत. प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा आरोग्य विभागाकडून फक्त फार्स करण्यात आला आहे, असा आरोप ग्रामस्थांतून केला जात आहे.
कुंभारी (ता. जत) येथे चिकुनगुन्याचे डास सापडले आहेत. या डासांची प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली आहे. आरोग्य विभागाने कोणतीही जनजागृती केलेली नाही. गावाला आरोग्य विभागाने पंधरा दिवसांपूर्वी भेट देऊन डासांची घनता, तसेच ग्रामपंचायतीला माहिती देऊन कार्यक्रम उरकला आहे. उमदी (ता. जत) येथे गतवर्षी डेंग्यूने एकाचा मृत्यू झाला होता. अद्यापही गावात घाणीचे साम्राज्य आहे.
सफाईकडे दुर्लक्ष केले आहे. औषध, धूर फवारणीही केलेली नाही. आरोग्य विभागाकडून आरोग्य केंद्रात औषध पुरवठा केला असल्याचे सांगितले जाते. जनजागृती करण्यामध्ये अपयश आले आहे.
गेल्या दोन—तीन वर्षातील चिकुनगुन्या, डेंग्यूच्या डासांची घनता, वाढ याचा आढावा घेऊन ही गावे आरोग्य विभागाने जाहीर केली. पण तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजनेत प्रशासन कमी पडले आहे. प्रशासनाची अनास्था आणि आरोग्य विभागाची डोळेझाक कारणीभूत आहे. याबाबत ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. (वार्ताहर)

चिकुनगुन्याचीही साथ
राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या संख प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील दरीबडची, तिकोंडी ही गावेही डेंग्यूची धोकादायक गावे मानली जातात. स्वच्छतेचा अभाव, घाणीचे साम्राज्य आहे. जनजागृती, औषध फवारणी, धूर फवारणी होत नाही. येथेही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. चिकुनगुन्याची साथ गावात आली होती.

Web Title: Six villages, including Dariabadi, have the highest risk of dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.