गिरगावमध्ये बिबट्यासदृश प्राण्याच्या हल्ल्यात सहा जखमी
By Admin | Updated: June 14, 2014 01:34 IST2014-06-14T01:32:18+5:302014-06-14T01:34:45+5:30
तिघांची प्रकृती गंभीर

गिरगावमध्ये बिबट्यासदृश प्राण्याच्या हल्ल्यात सहा जखमी
जत : जत तालुक्यातील गिरगाव येथे आज, शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास शिकारीसाठी गेलेले सहाजण बिबट्यासदृश प्राण्याच्या हल्ल्यात जखमी झाले. यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. जखमींना विजापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गुरुवारी बेंदूर झाल्याने आज, शुक्रवारी करीसाठी गिरगावमधील रावसाहेब चव्हाण, महादेव सबकाळे, महेश काटे, दत्ता चव्हाण, चंद्रकांत वाघमारे, मुबारक मुल्ला हे सहाजण सशाची शिकारीकरिता गेले. गिरगाव-लवंगा रस्त्यावरील लक्ष्मण चव्हाण यांच्या दोन एकर क्षेत्रातील उसाच्या शेतात ते चारही बाजूने वेगवेगळे शिरले. त्यावेळी बिबट्यासदृश प्राण्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. त्यांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक तेथे जमा झाले. या लोकांनी शेताला चारही बाजूने वेढा घातला. त्यामुळे सैरभैर झालेल्या या प्राण्याने तेथून पळ काढला. त्यानंतर तो प्राणी तेथेच असणाऱ्या एका विहिरीत पडला. लोकांनी विहिरीकडे धाव घेताच, त्या प्राण्याने पुन्हा उसाच्या शेताकडे पलायन केले. तो प्राणी अद्यापही त्या शेतात असल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले. या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी वन विभागाचे एक पथक गिरगावकडे रवाना झाले आहे. बिबट्यासदृश प्राण्याच्या हल्ल्यामुळे गिरगाव, लवंगा यासह पूर्व भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. (वार्ताहर)