मिरज सिव्हिलमधून आणखी सहा रेमडेसिविर इंजेक्शन गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:26 IST2021-05-01T04:26:09+5:302021-05-01T04:26:09+5:30
मिरज शासकीय रुग्णालयातून आणखी सहा रेमडेसिविर इंजेक्शन गायब असल्याने या इंजेक्शनचा शोध सुरू आहे. चार दिवसांपूर्वी सिव्हिलमधील ...

मिरज सिव्हिलमधून आणखी सहा रेमडेसिविर इंजेक्शन गायब
मिरज शासकीय रुग्णालयातून आणखी सहा रेमडेसिविर इंजेक्शन गायब असल्याने या इंजेक्शनचा शोध सुरू आहे. चार दिवसांपूर्वी सिव्हिलमधील अधिपरिचारक सुमित हुपरीकर आणि खासगी वैद्यकीय प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ दाविद वाघमारे यांना दोन रेमडेसिविर इंजेक्शन काळा बाजारप्रकरणी पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाच्या चाैकशीसाठी नियुक्त समितीने रुग्णालयातील गुरुवारी विविध वाॅर्डातील रेमडेसिविर साठ्याची तपासणी केली असता, दोन इंजेक्शनचा हिशेब लागत नसल्याने सिव्हिल प्रशासनाची धावपळ उडाली. याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांची झाडाझडती सुरू असतानाच शुक्रवारी आणखी सहा रेमडेसिविर इंजेक्शन गायब असल्याचे निष्पन्न झाल्याची चर्चा आहे. सुमारे आठ इंजेक्शन कोठे गेले, याबाबत चाैकशी सुरू असल्याची माहिती मिळाली. इंजेक्शन गायब करणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सिव्हिल प्रशासनाने या घटनेबाबत अद्याप पोलिसात तक्रार केली नसल्याने याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. सुमित हुपरीकर व दाविद वाघमारे यांच्या चाैकशीतून पोलिसांना सूत्रधारांपर्यंत पोहोचता आले नसल्याने रेमडेसिविर इंजेक्शन गायब प्रकरणाबाबत गूढ निर्माण झाले आहे. या घटनेची सखोल चौकशी केल्यास यातील सूत्रधार समोर येणार असल्याने या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी संघर्ष सफाई कर्मचारी संघटनेतर्फे डाॅ. महेशकुमार कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.