बाजार समिती संचालकांना आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:31 IST2021-08-25T04:31:34+5:302021-08-25T04:31:34+5:30
सांगली : बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत गुरुवारी (दि. २६) संपत आहे. निवडणुकांचा कार्यक्रमही अद्याप जाहीर झालेला नाही, त्यामुळे ...

बाजार समिती संचालकांना आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ?
सांगली : बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत गुरुवारी (दि. २६) संपत आहे. निवडणुकांचा कार्यक्रमही अद्याप जाहीर झालेला नाही, त्यामुळे विद्यमान संचालकांना मुदतवाढ मिळावी, असा प्रस्ताव पणन मंत्र्यांकडे सादर करण्यात आला आहे. सोमवारी सादर केलेल्या प्रस्तावात संचालकांनी आणखी सहा महिन्यांच्या मुदतीची विनंती केली आहे.
त्यानुसार मंत्र्यांनी मुदतवाढीचा निर्णय घेतल्यास सध्याचे संचालक सर्वाधिक काळ सत्तेवर राहणारे ठरतील. त्यांची पाच वर्षांची मुदत २६ ऑगस्ट २०२० रोजीच संपली आहे. पण कोरोना व लॉकडाऊनमुळे २६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत मुदतवाढीचा निर्णय शासनाने घेतला होता. पण मुदत संपलेल्या सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय शासनाने घेतला, त्यामुळे बाजार समितीच्या संचालकांना आणखी सहा महिन्यांची म्हणजे २६ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ मिळाली होती, ती गुरुवारी संपेल. निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्या पार्श्वभूमीवर आणखी मुदतवाढीचा प्रस्ताव संचालकांनी पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सादर केला आहे. त्यावर शासन कोणता निर्णय घेते याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सध्या मुदतवाढीचा कालावधी असला तरी संचालक मंडळाकडे नाममात्र अधिकार आहेत. कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नाही. त्यामुळे पणन मंत्र्यांनी विशेषाधिकारात मुदतवाढ द्यावी, अशी विनंती सभापती दिनकर पाटील यांनी केली आहे. तसे झाल्यास विकासकामांचे निर्णय घेता येतील, असा दावा पाटील यांनी केला.