कोरोनारुग्णाला सहा मिनिटे चालण्याची चाचणी जीवनदायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:35 IST2021-04-30T04:35:08+5:302021-04-30T04:35:08+5:30

सांगली : कोरोनाचा रुग्ण दाखल होताच त्याचे सीटी स्कॅन, एचआरसीटी चाचण्या यांचा मारा करू नका. त्याच्यासाठी सहा मिनिटे ...

A six-minute walking test is life-saving for a coronary patient | कोरोनारुग्णाला सहा मिनिटे चालण्याची चाचणी जीवनदायी

कोरोनारुग्णाला सहा मिनिटे चालण्याची चाचणी जीवनदायी

सांगली : कोरोनाचा रुग्ण दाखल होताच त्याचे सीटी स्कॅन, एचआरसीटी चाचण्या यांचा मारा करू नका. त्याच्यासाठी सहा मिनिटे चालण्याची चाचणी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते, असा सल्ला कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश झळके यांनी दिला. जनरल प्रॅक्टीशनर डॉक्टरांसाठीच्या कोविड संवाद सत्रात ते बोलत होते.

संयोजन डॉ. अब्दुल सलाम बिडीवाले, डॉ. देवपाल बरगाले व डॉ. मनोज पाटील यांनी केले. डॉ. झळके म्हणाले, चार-पाच वेळा सहा मिनिटे चालण्याच्या व्यायामानंतरही रुग्णाचा प्राणवायू स्थिर राहिला तर त्याला रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही. घरीच राहून उपचार घेऊ शकतो. रुग्ण उशिरा रुग्णालयात आल्याने धोका बळावतो. कोरोनामध्ये पहिला आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. ऑक्सिजन कमी होण्याची प्रक्रिया दुसऱ्या आठवड्यात सुरू होते. दुसऱ्या टप्प्यातच विषाणूचा फैलाव वाढू लागतो.

ते म्हणाले, सध्या प्रत्येक आजारावर कोरोना म्हणूनच उपचार करणे आवश्यक आहे. एचआरसीटी, स्कॅनिंगपेक्षा सहा मिनिटे चालण्याची चाचणी महत्त्वाची ठरते. सांगली जिल्ह्याची कोरोनाची उच्चांकी स्थिती अद्याप यायची आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत सर्वांत शेवटी ती येते असा अनुभव आहे.

डॉ. मनोज पाटील म्हणाले, तुलनेने सांगलीची स्थिती अजूनही चांगली आहे. जिल्ह्यात साडेसहा हजार डॉक्टर असून दहा रुग्णांमागे एक डॉक्टर आहे. सध्याची स्थिती बदलून मायक्रो कंटेन्मेंट झोनपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करू या. स्थानिक डॉक्टरांनी अचूक निर्णय घेऊन उपचार केले तर रुग्णांची गंभीर स्थिती निश्चित टळेल.

चौकट

तज्ज्ञांनी नोंदविलेली निरीक्षणे

- फुप्फुसाचा लिम्फोसाईट काउंट १० पेक्षा कमी असेल तर प्रकृती अत्यंत गंभीर

- अनेक कोरोनाबाधित मधुमेही असल्याचे उपचारादरम्यान निष्पन्न

- डी डायमर चाचणी २ मिलीग्रामपेक्षा जास्त असल्यास प्रकृती धोक्यात

- रुग्ण उशिरा रुग्णालयात आल्याने मृत्यूचे धोके वाढताहेत

- दुसऱ्या लाटेत २० ते ४० वर्षांचे तरुण संक्रमित

चौकट

संवाद सत्रातील महत्त्वाच्या सूचना

- ऑक्सिजन ९४-९५ पर्यंत आला तर रुग्णालयात दाखल करा

- दाखल केल्यावर आठवडाभरात एचआरसीटी चाचणी अजिबात नको

- प्रत्येक रुग्णाच्या सीटी स्कॅनची गरज नाही

- स्टेरॉईडसचा वापर सरसकट नको

Web Title: A six-minute walking test is life-saving for a coronary patient