बहादूरवाडीत पिसाळलेल्या कोल्ह्याच्या हल्ल्यात सहा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:27 IST2021-05-13T04:27:13+5:302021-05-13T04:27:13+5:30
बागणी : बहादूरवाडी (ता. वाळवा) येथे बुधवारी पिसाळलेल्या कोल्ह्याच्या हल्ल्यात सहा जण जखमी झाले असून, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर ...

बहादूरवाडीत पिसाळलेल्या कोल्ह्याच्या हल्ल्यात सहा जखमी
बागणी : बहादूरवाडी (ता. वाळवा) येथे बुधवारी पिसाळलेल्या कोल्ह्याच्या हल्ल्यात सहा जण जखमी झाले असून, त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये दोन पुरुष व चार महिलांचा समावेश आहे. त्यानंतर पिटाळून लावत असताना जमावाकडून कोल्हा ठार झाला.
गावातून मिळालेल्या माहितीनुसार, गावालगतच्या शेतातील वस्तीमध्ये राहणारे पांडुरंग कृष्णा देसावळे बुधवारी सकाळी जनावरांना चारा देत असताना अचानक त्यांच्यावर पिसाळलेल्या कोल्ह्याने हल्ला चढवला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांनी आरडाओरडा करताच त्यांच्या पत्नी बाहेर आल्या. त्यांच्यावरही त्याने हल्ला केला. त्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारील खोत कुटुंबातील महिला बाहेर आल्या. तेव्हा त्यांच्यावरही कोल्ह्याने चाल केली.
या पिसाळलेल्या कोल्ह्याच्या हल्ल्यात तिघांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या. सर्वांच्या आरडाओरड्याने जमा झालेल्या गावातील युवकांनी कोल्ह्यास हुसकावून लावले. त्यानंतर कोल्ह्याने काही अंतरावर असणाऱ्या लक्ष्मण हरी देसावळे यांच्यावर हल्ला केला. त्यात ते किरकोळ जखमी झाले. तेव्हा पिटाळून लावण्यासाठी जमावाने कोल्ह्याचा पाठलाग केला. त्यात तो ठार झाला.
जखमींना उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्यातील तीन महिलांना प्राथमिक उपचार करून घरी पाठवण्यात आले.
दोघांची प्रकृती गंभीर आहे. माहिती मिळताच सरपंच नंदादेवी शिंगे, उपसरपंच महेश खोत, माजी उपसरपंच भोजराज घोरपडे, ग्रामसेवक डी. पी. सिंग, तलाठी धनश्री पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.
वन्य प्राण्यांच्या मानवी वस्तीत येण्याच्या घटना वाढल्या असून, यावर वन्यविभागाने उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे.