उद्योगक्षेत्राची परिस्थिती बिकट, लॉकडाऊनचे नको पुन्हा संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:25 IST2021-03-31T04:25:59+5:302021-03-31T04:25:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मागील वर्षी झालेल्या लॉकडाऊनच्या फटक्यातून काही प्रमाणात सावरलेल्या उद्योजकांमध्ये लॉकडाऊनच्या पर्यायाबद्दल चिंता व्यक्त केली ...

उद्योगक्षेत्राची परिस्थिती बिकट, लॉकडाऊनचे नको पुन्हा संकट
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मागील वर्षी झालेल्या लॉकडाऊनच्या फटक्यातून काही प्रमाणात सावरलेल्या उद्योजकांमध्ये लॉकडाऊनच्या पर्यायाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊन झाल्यास जिल्ह्यातील उद्योजक होणारे नुकसान सहन करू शकणार नाहीत. येथील उद्योग क्षेत्र पूर्णपणे विस्कळीत होईल, अशी भीती उद्योजकांनी व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात लॉकडाऊनची चर्चा जोर धरत आहे. कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात येत असताना ती थांबविण्यासाठी शासनाच्या वतीने व जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजनांचे नियोजन सुरू आहे. सध्या रात्रीची संचारबंदी व व्यापार, व्यावसायास वेळेची मर्यादा घालण्यात आली आहे. त्यापुढील टप्पा लॉकडाऊनचा असू शकतो, असा इशाराही शासनस्तरावर देण्यात आला आहे. त्यामुळे व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांमधून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. हा लाॅकडाऊन परवडणारा नसेल, असे मत व्यक्त केले जात आहे.
कोट
मोठ्या आर्थिक संकटातून उद्योग आता कुठे रुळावर येत असताना पुन्हा लॉकडाऊनची चर्चा व त्याबाबतचा पर्याय शासनामार्फत पुढे केला जात आहे. ही गोष्ट उद्योग घटकासाठी त्रासदायी व मोठे संकट घेऊन येणारी आहे. कामगार, उद्योग व अन्य सर्वच घटक यात भरडले जातील. त्यामुळे शासनाने, जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनऐवजी अन्य पर्यायांचा विचार करावा.
- संजय अराणके, अध्यक्ष, सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन
कोट
लॉकडाऊनबाबत शासनाने, प्रशासनाने अजिबात विचार करू नये. उद्योजक, कामगार, वित्तीय संस्था, ठेवीदार अशा विविध घटकांना याचा मोठा आर्थिक फटका बसेल. जिल्ह्याचे अर्थचक्र पुन्हा कोलमडेल. त्यामुळे लोकांनी स्वयंशिस्त पाळावी, लसीकरणाला प्रतिसाद द्यावा. या उपायांचा चांगला परिणाम होऊ शकतो. लॉकडाऊनमुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान होईल.
- सचिन पाटील, अध्यक्ष, वसंतदादा औद्योगिक वसाहत, सांगली
कोट
मागील वर्षी लाॅकडाऊनमुळे उद्योग क्षेत्राला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. आता पुन्हा तशा परिस्थितीचा सामना करण्याची ताकद उद्योजकांत राहिलेली नाही. हे क्षेत्र संकटात असल्याने लॉकडाऊनचा पर्याय नको. पुन्हा लॉकडाऊन झाल्यास त्यातून सावरणे आम्हाला कठीण जाईल. हातावरचे पोट असणारेही यात उद्ध्वस्त होतील.
- संतोष भावे, उपाध्यक्ष, गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहत, मिरज
कोट
उद्योजकांचे अर्थचक्र आता कुठे सुरळीत होत असताना पुन्हा लॉकडाऊनची चर्चा होणे चुकीचे आहे. पुन्हा हे संकट पचविणे उद्योजकांना शक्य होणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील उद्योजकांच्या भावना व अडचणी समजून घ्याव्यात. शासनाकडे आमची कोणतीही मागणी नाही, केवळ उद्योजकांना कोणताही त्रास होऊ नये इतकी दक्षता घ्यावी, ही अपेक्षा आहे.
-उद्धव दळवी, उद्योजक मिरज