‘समाजकल्याण’ची एसआयटीकडून चौकशी
By Admin | Updated: May 12, 2016 00:15 IST2016-05-11T22:59:40+5:302016-05-12T00:15:02+5:30
सहायक लेखाधिकाऱ्यांची नियुक्ती : दीपक घाटे यांच्याकडून सह्या करण्याचा डाव शिवसेनेने उधळला

‘समाजकल्याण’ची एसआयटीकडून चौकशी
सांगली : सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालयातील खर्चामध्ये अनियमितता आणि शिष्यवृत्ती घोटाळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने एसआयटी (विशेष चौकशी पथक)ची नियुक्ती केली आहे. यामध्ये स्थानिक लेखा विभागाचे सहायक लेखाधिकारी पांडुरंग बेलेकर यांची सांगली कार्यालयाच्या चौकशीसाठी नियुक्ती केली आहे.
बेलेकर यांनी गेल्या दोन दिवसांपासून चौकशी सुरु केली असून, शिष्यवृत्तीमध्ये अनियमितता आढळून आली आहे. तसेच काही आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे दिसत असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रजेवर असलेले सहायक समाजकल्याण आयुक्त दीपक घाटे बुधवारी सकाळी कार्यालयात आल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तेथून जाण्याची सूचना केली. यामुळे वातावरण चांगलेच तापले होते.
सोलापूर जिल्ह्यातील सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालयात कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाला होता. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सोलापुरातील शिष्यवृत्ती घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने राज्यातील सर्वच सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालयांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील स्थानिक लेखा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी समिती गठित केली आहे. या समितीकडून सध्या शिष्यवृत्ती घोटाळ्यासह अन्य योजनांचीही चौकशी सुरु झाली आहे.
चौकशी अधिकारी बेलेकर यांनी सोमवार, दि. ९ मेपासून चौकशी सुरु केली आहे. यामध्ये शासनाची मान्यता नसतानाही काही महाविद्यालये व काही संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या नावे लाखो रूपयांची शिष्यवृत्ती वर्ग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
एवढेच नव्हे, तर सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालयामधील अन्य योजनांच्या खर्चामध्येही गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक चौकशीत दिसत असल्याचे खात्रीशीर सूत्राने सांगितले. चौकशी चालू असल्यामुळे अधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती सांगण्यास नकार दिला.
दरम्यान, सोलापूरच्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात दोषी असलेले घाटे यांची सध्या सांगलीतील सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालयात नियुक्ती आहे. पण, सहा महिन्यांपासून ते रजेवरच आहेत. म्हणून त्यांच्या रिक्त जागेवर जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचे अधिकारी सचिन कवले यांची नियुक्ती केली आहे. बुधवारी सकाळी घाटे यांनी सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालयात येऊन जुन्या कागदपत्रावर सह्या करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप शिवसेनेचे अनिल शेटे यांनी केला आहे.
तुम्ही रजेवर असताना कार्यालयात कसे आलात, असा आरोप शेटे यांनी करून त्यांना कार्यालयातून जाण्यास सांगितले. यावरून कार्यालयात गोंधळ निर्माण झाला होता. अखेर घाटे तेथून निघून गेल्याने गोंधळ थांबला. (प्रतिनिधी)
मनमानी कारभार : अधिकाऱ्यांच्या अंगलट
सांगलीतील जुना बुधगाव रस्त्यावरील सामाजिक न्याय भवनमधील सहायक समाजकल्याण आयुक्त कार्यालय नोकरभरती, वसतिगृहातील जेवणाचा ठेका या प्रकरणांवरून नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. सध्याच्या सरकारने समाजकल्याण विभागाकडील आर्थिक घोटाळे बाहेर काढून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. विशेष चौकशी पथकाकडून चौकशी सुरू झाल्यामुळे घोटाळ्याचा कलंक लागलेले अनेक अधिकारी चिंतेत सापडले आहेत.