बहिणीचे दागिने मोडले अन् मावशीला देशोधडीला लावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:32 IST2021-08-14T04:32:21+5:302021-08-14T04:32:21+5:30
इस्लामपूर : आर्थिक अडचण असल्याचे कारण सांगत स्वत:च्या सख्ख्या बहिणीसह इतर अनेक कष्टकरी महिलांना आर्थिक गंडा घालणाऱ्या मारुती जाधवच्या ...

बहिणीचे दागिने मोडले अन् मावशीला देशोधडीला लावले
इस्लामपूर : आर्थिक अडचण असल्याचे कारण सांगत स्वत:च्या सख्ख्या बहिणीसह इतर अनेक कष्टकरी महिलांना आर्थिक गंडा घालणाऱ्या मारुती जाधवच्या कारनाम्याची व्याप्ती वाढतच चालली आहे. मात्र तरीही पोलिसांसमोर ‘तो मी नव्हेच’ असा अविर्भाव तो आणत आहे. पोलिसांनी शुक्रवारी त्याच्याकडून बहिणीचे सोन्याचे दागिने शहरातील एका सराफाकडे मोडल्याची कबुली घेतली आहे. मारुती जाधवविरुद्ध आर्थिक लुबाडणुकीच्या तक्रारींचा पाऊस पडत चालल्याची परिस्थिती आहे.
तीन वर्षांपूर्वी बहिणीकडून ५ लाख रुपये किमतीचे १३ तोळे सोन्याचे दागिने घेतल्यानंतर पैशाच्या हव्यासाने तो एकापाठोपाठ एक अशा अनेकांना गंडा घालत सुटला आहे. यामध्ये त्याने स्वत:च्या मावशीची घरजागाही बळकावली. तिला देशोधडीला लावले. मावशीच्या जागेत घर बांधण्याचे आमिष दाखविले. घर बांधून झाल्यानंतर १४ लाख रुपयांना त्या घराची विक्री करून मावशीला निराश्रित करून सोडले. लष्करातून निवृत्त झालेल्या एका जवानालाही त्याने घर देण्याच्या नावाखाली १४ लाखांचा गंडा घातला आहे.
अनिता देशमाने या बहिणीने पोलिसात फिर्याद दिल्यानंतर मारुती जाधवचा खरा चेहरा समोर आला आहे. त्याने आर्थिक लुबाडणूक करताना कष्टकरी महिलांना लक्ष्य केले आहे. मोलमजुरी करून पैशाची बचत करण्यासाठी चालणारे महिला बचत गट आणि कित्येक भिशांमधूनही लाखो रुपयांची उचल केली आहे. अनेक खासगी सावकारांकडूनही त्याने लाखाच्या पटीत रकमा उचलल्या आहेत.
मारुती जाधवकडून झालेल्या आर्थिक फसवणुकीमध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. शुक्रवारी २५ महिलांची जवळपास १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस ठाण्यात या सर्व महिलांचे जबाब नोंदवून घेत जाधव याच्याविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा दुसरा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. ठेवीदार संरक्षण कायद्याखाली त्याच्या नाड्या आवळण्याची कारवाई सुरू आहे. दरम्यान, बहिणीकडून घेतलेले सोने मारुती जाधवने शहरातील एका सराफी व्यावसायिकाकडे मोडले आहे. पोलिसांनी त्या सराफी व्यापाऱ्याकडे जाऊन त्याची खात्री केली. सहायक उपनिरीक्षक बळीराम घुले अधिक तपास करीत आहेत.