ओळ : गाेटखिंडी (ता. वाळवा) येथे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सहावर्षीय संचित गावडे या बालकाच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन केले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
गोटखिंडी : वाळवे तालुक्यात सध्या कोट्यवधीच्या विकासकामांच्या उद्घाटनांची धामधूम सुरू आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत गावाेगावी मातब्बर मंडळी व कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून येत आहे. भडकंबे (ता. वाळवा) येथेही विविध विकासकामांच्या उद्घाटनानिमित्त जयंत पाटील यांचे आगमन झाले. कार्यक्रम सुरू झाला आणि गर्दीतून वाट काढत संचित गावडे हा सहा वर्षाचा बालक ‘साहेब.. मी फाेडू नारळ?’ म्हणत थेट जयंत पाटील यांच्यासमाेर आला. जयंत पाटील यांनीही आपल्या हातातला नारळ त्याला फाेडायला लावून उपस्थितांची मने जिंकली.
भडकंबे येथे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, विजय पाटील, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, सरपंच सुधीर पाटील, अशोक पाटील यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे उद्घाटन झाले. येडेनिपाणी ते बावची रस्त्याच्या कामाचा प्रारंभ जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते गोटखिंडी बसस्थानक परिसरात झाला. आष्टा-दुधगाव रस्ता, बागणी-ढवळी-बहादूरवाडी रस्ता, ढवळी ते कोरेगावदरम्यान दोन लहान पूल, नागाव-भडकंबे-बहादूरवाडी फाटा रस्ता या विविध कामांचा आरंभ करण्यात आला.
भडकंबे येथे कार्यक्रम सुरू असताना सहावर्षीय संचित थेट जयंत पाटील यांच्याकडे आला. ‘साहेब... मीपण फोडू का नारळ?’ असे म्हणून ताे निरागसपणे जयंत पाटील यांच्याकडे पाहू लागला. जयंत पाटील यांनीही लागलीच त्याची इच्छा पूर्ण करत आपल्या हातचा नारळ त्याला फाेडायला लावला. आपल्या कृतीने पाटील यांनी उपस्थितांची मने जिंकली.
चाैकट
काेट्यवधीच्या कामांचा धडाका
मंत्री जयंत पाटील यांनी वाळवा विधानसभा मतदारसंघात दोन दिवसात तब्बल ४१ कोटी रुपयांचा विकासकामांचा प्रारंभ केला. गोटखिंडी येथे सरपंच विजय लोंढे, जिल्हा परिषद सदस्या राजश्री एटम, पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील, विनायक पाटील, धैर्यशील थोरात, सागर डवंग, डॉ. अविनाश पाटील, सुभाष शिंगटे, भानुदास पाटील, एन. जी. पाटील उपस्थित होते.