सांगली : शहरातील एका फायनान्स कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याने कर्जदाराशी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत महिलांचाही अपमान केल्याने मनसेच्या कार्यकत्यांनी कार्यालयास टाळे ठोकले. तो अधिकारी जोवर माफी मागत नाही, तोवर कार्यालय बंद ठेवण्याचा इशाराही मनसैनिकांनी दिला.शहरातील जिल्हा परिषदेसमाेर त्या फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. कर्जाच्या वसुलीसाठी दिल्ली येथील एका कंपनीला एजन्सी देण्यात आली आहे. कंपनीच्या एका कर्जदाराला एजन्सीच्या वसुली अधिकाऱ्याने फोन केला यावर कर्जदाराने अडचणीमुळे मी थोडे थोडे करून पैसे भरतो, असे सांगितले. यावर तुझ्या शिवाजीने दिले होते का, असे तो अधिकारी म्हणाला. यावर ग्राहकाने शिवाजी कोण, असे विचारले असता, महाराज शिवाजी, असे तो अधिकारी म्हणाला. यावर कर्ज मी घेतले आहे, महाराजांना मध्ये का आणता, असे ग्राहक म्हणाला. त्यावर पुन्हा त्याने अधिकाऱ्याने तुझा छत्रपती देणार का, असे म्हणत त्याने ऐकरी भाषा वापरत अपमान केला.त्यानंतर तुझ्या बायकोचे कुंकू पुसून कर्ज फेड, असेही तो अधिकारी म्हणाला. ही घटना समजताच संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकत्यांनी फायनान्स कंपनीचे कार्यालय गाठत जाब विचारला. जोपर्यंत तो अधिकारी माफी मागत नाही व कंपनीकडून त्या एजन्सीचे काम बंद करण्यात येत नाही, तोवर कार्यालय बंद ठेवण्याचा इशारा देत मनसेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयास टाळे ठोकले.मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव जमीर सनदी, शहराध्यक्ष दयानंद मलपे, विठ्ठल शिंगाडे, अमित पाटील, सोनू पाटील, कुमार सावंत, प्रवीण देसाई, राजू पाटील, संजय खोत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, सांगलीत फायनान्स कंपनीच्या मुजाेरीला मनसेचा चाप
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 19:42 IST