डायल ‘११२’ करताच अवतरणार ‘सिंघम’! अत्यंत कमी वेळेत मिळणार पोलिसांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:25 IST2021-05-23T04:25:20+5:302021-05-23T04:25:20+5:30
सांगली : कोणतीही अडचण असली आणि तुम्ही कोणत्याही भागात असला तरी तुम्हाला आता मदत मिळणे अधिक सोयीस्कर होणार आहे. ...

डायल ‘११२’ करताच अवतरणार ‘सिंघम’! अत्यंत कमी वेळेत मिळणार पोलिसांची मदत
सांगली : कोणतीही अडचण असली आणि तुम्ही कोणत्याही भागात असला तरी तुम्हाला आता मदत मिळणे अधिक सोयीस्कर होणार आहे. पोलिसांकडून सर्वांच्या परिचित असलेला ‘एक शून्य शून्य’ क्रमांक लवकरच बंद होऊन त्याच्याऐवजी ११२ हा क्रमांक चालू होणार आहे. ‘रियल टाइम रेड्युस’ तंत्राद्वारे काम करणाऱ्या या यंत्रणेमुळे अगदी १० मिनिटात पोलिसांची मदत मिळणे शक्य होणार आहे.
आपत्कालीन मदतीसाठी वेगवेगळे क्रमांक सध्या अस्तित्वात आहेत. मात्र, हे क्रमांक सर्वांनाच माहिती असतील असे नसल्याने आता संपूर्ण देशपातळीवरच एकच क्रमांक अस्तित्वात येणार आहे. त्यानुसार आता १०० नंबरऐवजी ११२ नंबरवर सर्वसामान्यांना पोलिसांची मदत मिळणार आहे. या यंत्रणेच्या मदतीसाठी चारचाकी व दुचाकी वाहनांची सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यात सांगली, मिरज, इस्लामपूर आणि तासगाव शहरात ११२ वर मदत मागितल्यास दुचाकीवरून पोलीस हजर होणार आहेत. त्यामुळे अडचणीत असलेल्या नागरिकांना याचा फायदा हाेणार आहे. ज्येष्ठ नागरिक, महिलांना याचा चांगला फायदा होणार आहे.
चौकट
१७० पोलिसांना प्रशिक्षण
जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांतून ही यंत्रणा असणार आहे. ११२ क्रमांकावर कॉल केल्यानंतर तो जिल्हा नियंत्रण कक्षातून त्या भागातील पोलिसांपर्यंत पोहोचणार आहे. यासाठीचे पोलिसांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, तर जिल्हा नियोजन समितीतून मिळालेल्या काही वाहनांतील वाहनेही यासाठी दिली जाणार आहेत. वाहनचालकांसह पोलिसांनाही याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
चौकट
जीपीएसद्वारे लोकेशन
जीपीएस तंत्राचा वापर असल्याने या क्रमांकावर मदत मागणाऱ्या व्यक्तीच्या सर्वात जवळ कोणते वाहन अथवा पोलीस आहे हे आपोआप ओळखून त्यास हा ‘कॉल’जाणार आहे. त्यामुळे अत्यंत कमी वेळेत मदत मिळणे शक्य होणार आहे. मदत मागणाऱ्यांपासून अत्यंत जवळ असलेल्या पोलिसांपर्यंत हे पाेहोचणार असल्याने लवकर मदत मिळणे शक्य होणार आहे. नवीन यंत्रणेचा हाच उद्देशही आहे.
चौकट
पोलीस मदतीसाठी ११२ डायल करा
* आपत्कालीन परिस्थितीत मदत हवी असल्यास ११२ क्रमांकावर मदत मागितल्यास जास्तीत जास्त दहा मिनिटांत ती मिळू शकणार आहे.
* सध्या या यंत्रणेची चाचणी सुरू असून लवकरच ती पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.
चौकट
मदतीसाठी वाहनांची सोय
जिल्हा पोलीस दलास मिळालेल्या नवीन वाहनांसह इतर वाहनांचा यासाठी वापर होणार आहे. त्यात ‘टॅब’ची सोय असणार आहे. टॅबवर मदत मागणाऱ्यांचे लोकेशन व इतर माहिती पाठविण्यात येणार असून त्यामुळे लगेच माहिती मिळाल्याने या पथकातील कर्मचाऱ्यांना मदत करणे सोपे होणार आहे.
चौकट
१७० कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
जिल्ह्यातील २५ पोलीस ठाण्यात ही यंत्रणा असणार आहे. यासाठी वाहनचालक व ‘डायल ११२’ पथकात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पोलीस मुख्यालयात सुरू होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्याने आता यंत्रणा कार्यान्वित झाल्यावर त्याची मदत होणार आहे.
कोट
आपत्कालीन परिस्थितीत, अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी ही यंत्रणा खूपच फायदेशीर आहे. कमीत कमी वेळेत पोलीस मदत मिळण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे.
दीक्षित गेडाम, पोलीस अधीक्षक
चौकट
एकूण पोलीस ठाणी २५
एकूण पोलीस अधिकारी १५४
पोलीस २५८४