सिंधुदुर्ग गॅझेटमध्ये बारा प्रकरणांचा समावेश

By Admin | Updated: October 1, 2015 00:41 IST2015-09-30T23:54:34+5:302015-10-01T00:41:43+5:30

जिल्हाधिकारी अनिल भंडारी : सिंधुदुर्गनगरीत दर्शनिका निर्मितीसाठी बैठक

In the Sindhudurg Gazette, 12 cases are included | सिंधुदुर्ग गॅझेटमध्ये बारा प्रकरणांचा समावेश

सिंधुदुर्ग गॅझेटमध्ये बारा प्रकरणांचा समावेश

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा गॅझेटियरमध्ये बारा प्रकरणांचा समावेश असून, गॅझेटियरची दोन खंडामध्ये निर्मिती करण्यात आली आहे. शासनस्तरावर प्रकाशित होणारे गॅझेटियर वस्तुनिष्ठ व माहितीवर आधारित असेल. दर्शनिकासाठी जिल्हास्तरीय यंत्रणांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरावर नोडल आॅफिसर्सची नियुक्ती करण्यातत येईल. दर्शनिका निर्मितीसाठी जिल्हास्तरावरून प्रशासनाकडून माहिती उपलब्ध करून देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.जिल्हा नियोजन समिती सभागृहात दर्शनिका (गॅझेटियर) निर्मितीसाठी आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी अनिल भंडारी बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार, दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दीपक बलसेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर, निवासी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, पोलीस उपअधीक्षक गृह अनंत आरोसकर, सिंधुदुर्ग दर्शनिका संपादकीय मंडळातील सदस्य डॉ. जी. ए. बुवा, सर्व विभागातील खातेप्रमुख यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले, प्रत्येक विभागाने दर्शनिका विभागाच्या मागणीनुसार माहिती उपलब्ध करून द्यायची आहे. या ग्रंथात एकूण बारा प्रकरणांचा समावेश असणार आहे. सिंधुदुर्गचे गॅझेट सर्वंकष होण्यासाठी वस्तुनिष्ठ माहिती देण्याची जबाबदारी सर्व प्रशासकीय विभागांची राहिल.
भूगोल, इतिहास, लोक, कृषी व जलसिंचन, उद्योगधंदे, बँक व्यवसाय, वाहतूक व दळणवळण, आर्थिक विकास, प्रशासन, सामाजिक सेवा, संस्कृती, प्रेक्षणीय स्थिळे, ग्रामनिर्देशिका अशाप्रकारे जिल्ह्याच्या वैशिष्ट्यपूर्ण विषयांवर आधारित माहितीचा यामध्ये समावेश असेल, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली.(प्रतिनिधी)


ऐतिहासीक, सांस्कृतिक माहितीचाही समावेश
दर्शनिकाचे संपादकीय मंडळाचे सदस्य डॉ. जी. ए. बुवा म्हणाले, सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. पर्यटनामुळे त्याची असणारी ओळख, इतिहासाचा साक्षीदार आणि नैसर्गिक विविधतेबरोबर संस्कृतीचा वारसा लाभलेल्या सिंधुदुर्गचे गॅझेटियर नक्कीच दर्जदार आणि वाचनीय होण्यासाठी सर्वांचे सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. जिल्ह्याचे गॅझेट सर्वंकष माहितीचे आगार असेल. या गॅझेटमध्ये प्रशासकीय माहितीबरोबर ऐतिहासिक व सांस्कृतिक माहितीही यामध्ये देण्यात येईल, अशी माहिती प्रा. जी. ए. बुवा यांनी यावेळी दिली.

गॅझेटियर म्हणजे भौगोलिक कोश
गॅझेटियर म्हणजे, भौगोलिक कोश ज्यामध्ये प्राकृतिक भूस्वरूप, नद्या, वनसंपदा, स्थळांचे भौगोलिक तपशील, लोकांच्या चालीरिती, राजघराण्याचा इतिहास, महसूल प्रशासन यासारखे तपशील पुरवले जातात. शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिनस्त असलेल्या दर्शनिका विभागामार्फत सिंधुदुर्ग गॅझेटियरची निर्मिती करण्यात येणार आहे. या विभागामार्फत ब्रिटिश कालखंडापासून आजपर्यंत विविध महत्वपूर्ण विषय तसेच अनेक जिल्ह्यांचे इंग्रजी व मराठी माध्यरमातून गॅझेटियर प्रकाशित केले असल्याची माहितीही डॉ. दीपक बलसेकर यांनी यावेळी दिली.

Web Title: In the Sindhudurg Gazette, 12 cases are included

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.