सांगलीसह १२ जिल्हा बँकांची निवडणूक एकाचवेळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:32 IST2021-08-14T04:32:45+5:302021-08-14T04:32:45+5:30
सांगली : कोरोनामुळे गेल्या सव्वा ते दीड वर्षापासून लांबणीवर पडलेल्या राज्यातील मुदत संपलेल्या सर्व १२ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांची ...

सांगलीसह १२ जिल्हा बँकांची निवडणूक एकाचवेळी
सांगली : कोरोनामुळे गेल्या सव्वा ते दीड वर्षापासून लांबणीवर पडलेल्या राज्यातील मुदत संपलेल्या सर्व १२ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांची निवडणूक एकाचवेळी होणार आहे. यासाठी ३ सप्टेंबरपासून मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. हा कार्यक्रम २५ दिवस चालणार असून, त्यानंतर दहा दिवसांनी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल. त्यामुळे या १२ बँकांच्या निवडणुकीची रणधुमाळी ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील मुदत संपलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांची निवडणूक जवळपास दीड वर्षे राज्य शासनाने वारंवार लांबणीवर टाकली होती. जिल्हा बॅंकांसह अन्य सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत स्थगिती आहे. दोनच दिवसांपूर्वी शासनाने सहकारी संस्थांमधील केवळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांच्या निवडणुकांवरील स्थगिती उठवत ज्या टप्प्यावर या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या, तेथून पुढे त्या तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. दरम्यान, कोरोना काळात न्यायालयाच्या आदेशाने काही जिल्हा बॅंकांच्या निवडणुका झाल्या. उर्वरित मुदत संपलेल्या १२ जिल्हा बॅंकांच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या बॅंकांमध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा यासह पुणे, लातूर, मुंबई, जळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, धुळे-नंदुरबार या बॅंकांचा समावेश आहे.
जिल्हा बॅंकांची निवडणूक प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची ऑनलाईन बैठक नुकतीच पार पडली. प्राधिकरणाचे अध्यक्ष जगदीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत सर्व विभागीय सहनिबंधक व प्राधिकरणाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा बॅंकांच्या निवडणुकांबाबत चर्चा करून आढावा घेण्यात आला. काही बॅंकांची कच्ची मतदार यांनी अद्याप तयार झालेली नाही, तसेच त्याची बॅंक स्तरावर छाननीही झालेली नाही. त्यामुळे ऑगस्टमध्ये ही प्रक्रिया पार पाडून सर्व जिल्हा बॅंकांचा निवडणूक कार्यक्रम एकचवेळी घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सर्व बॅंकांची अंतिम मतदार यांनी तयार करण्याचा कार्यक्रम ३ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी ३ सप्टेंबरला कच्ची मतदार यादी जाहीर केली जाईल. तेथून पुढे दहा दिवस या यादीवर हरकती मागवल्या जाणार आहेत. दहा दिवसांनंतर त्यावर सुनावणी घेतली जाणार असून, पुढील पाच दिवसांत अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे या कार्यक्रम २५ दिवसांचा असणार आहे. अंतिम मतदार यांनी जाहीर झाल्यानंतर १० दिवसांनंतर व २० दिवसांच्या आत प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा लागतो. हा कालावधी पाहता, जिल्हा बॅंकांची निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार, हे आता निश्चित झाले आहे.
चौकट
या बॅंकांची निवडणूक होणार
सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, लातूर, मुंबई, जळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, नाशिक, धुळे-नंदुरबार.