पंचायतन गणपतीचे मिरवणुक टाळून साधेपणाने विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:32 IST2021-09-15T04:32:09+5:302021-09-15T04:32:09+5:30
सांगलीत कृृष्णा नदीकाठी गणेशभक्तांनी गणरायाला निरोप दिला. फोटो १४ संतोष ०२ सांगलीत पंचायतन गणपतीच्या विसर्जनापूर्वी दरबार हॉलमध्ये विजयसिंहराजे पटवर्धन ...

पंचायतन गणपतीचे मिरवणुक टाळून साधेपणाने विसर्जन
सांगलीत कृृष्णा नदीकाठी गणेशभक्तांनी गणरायाला निरोप दिला.
फोटो १४ संतोष ०२
सांगलीत पंचायतन गणपतीच्या विसर्जनापूर्वी दरबार हॉलमध्ये विजयसिंहराजे पटवर्धन व राजलक्ष्मी पटवर्धन यांनी आरती केली. यावेळी पटवर्धन परिवारासह गणेशभक्तांनी हजेरी लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांनी कृष्णा नदीकाठी गर्दी केली होती. पंचायतनच्या गणेशाचेही सायंकाळी साधेपणाने विसर्जन झाले.
राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये सायंकाळी विजयसिंहराजे पटवर्धन आणि राजलक्ष्मी पटवर्धन यांनी गणरायाची आरती केली. यावेळी पटवर्धन परिवारासह भाविक, पोलीस अधिकारी उपस्थित होते. आरतीनंतर राजलक्ष्मी पटवर्धन यांनी बाप्पाला निरोपाचा नैवेद्य दाखविला. त्यानंतर वाहनातून बाप्पाची स्वारी विसर्जनासाठी निघाली. एका चारचाकीमध्ये गौरी - गणपती आणि दुसऱ्या चारचाकीमध्ये विजयसिंहराजे व राजलक्ष्मी पटवर्धन होते. मिरवणुकीचा सोहळा किंवा राजेशाही थाट यांना फाटा देत कृष्णा नदीत विसर्जन झाले.
दरम्यान, शहरवासीयांनीही पाचव्या दिवशी गणेश विसर्जन केले. त्यासाठी कृष्णाकाठी दुपारपासूनच गर्दी झाली होती. महापालिकेने नदीकाठी निर्माल्य कुंड, मूर्तिदान आदी सुविधा उपलब्ध केल्या होत्या. शहरातही ठिकठिकाणी विसर्जन कुंड ठेवले होते. पर्यावरणासाठी जागरूक गणेशभक्तांनी मूर्तींचे दानही केले. काही स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी निर्माल्य संकलन करून नदीचे प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न केला. विसर्जनासाठी सज्ज असलेल्या यांत्रिक बोटींमधून कार्यकर्त्यांनी बाप्पांच्या मूर्ती नदीत विसर्जित केल्या. गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने रात्री उशिरापर्यंत कृष्णाकाठ निनादत राहिला. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही मिरवणुका टाळून साधेपणाने गणेशमूर्ती विसर्जनासाठी आणल्या.
चौकट
संकटे दूर करण्याची बाप्पांना प्रार्थना
विजयसिंहराजे म्हणाले की, गेली दोन वर्षे आपण कोरोनाच्या संकटाला तोंड देत आहोत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गणेशोत्सव साधेपणाने केला. कोरोना आणि महापुराच्या संकटातून मुक्त करण्याची प्रार्थना गणेशाला केली. सर्वांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी काळजी घ्यावी.