पेठनाक्यावर दहा लाखांची चांदी पकडली
By Admin | Updated: June 16, 2016 01:18 IST2016-06-16T01:18:11+5:302016-06-16T01:18:41+5:30
गुंडाविरोधी पथकाची कारवाई : रेंदाळ येथील एकजण ताब्यात

पेठनाक्यावर दहा लाखांची चांदी पकडली
सांगली : बेकायदेशीरपणे चांदीची वाहतूक करणाऱ्या जितेंद्र मनोहर नाडगे (वय ४५, रा. रेंदाळ, मानेनगर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) या चांदी व्यावसायिकाला बुधवारी दुपारी गुंडाविरोधी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून दहा लाख रुपये किमतीचे चांदीचे दागिने, पैंजण व चारचाकी वाहन असे एकूण १७ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथील जितेंद्र नाडगे चांदी वाहतुकीचा परवाना व दागिन्याची मूळ कागदपत्रे नसताना चांदीचे दागिने घेऊन पेठनाक्यावर येणार असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाचे निरीक्षक बाजीराव पाटील यांना ारजमा करण्याचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुख दत्तात्रय शिंदे व अतिरिक्त पोलिस प्रमुख कृष्णकांत उपाध्याय यांनी दिले होते. त्यानुसार पथकाने पेठनाका येथे सापळा रचला होता.
दुपारी पावणेतीन वाजता मोटार (एमएच ०९ डीएम ४१०१) पेठनाक्यावर आल्यानंतर पथकाने गाडी थांबवून तपासणी केली. यावेळी गाडीच्या डिकीमध्ये लपविलेले ९ लाख ८४ हजार १०५ रुपये किंमतीचे चांदीचे दागिने व पैंजण मिळाले. पोलिस पथकाने जितेंद्र नाडगे यांच्याकडे दागिन्याबाबतच्या कागदपत्रांची मागणी केली, पण ते या दागिन्यावरील मालकी हक्क सांगू शकले नाहीत. अखेर पथकाने त्यांना ताब्यात घेतले. दहा लाख रुपये किंमतीचे चांदीचे दागिने व चारचाकी वाहन असे एकूण १७ लाख ८४ हजार रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी इस्लामपूर पोलिसांना दिले आहेत.
या कारवाईत बाजीराव पाटील यांच्यासह हवालदार सुनील भिसे, श्रीपती देशपांडे, महेश आवळे, सागर लवटे, शंकर पाटील, गुंडाबा खराडे, प्रफुल्ल सुर्वे, विमल नंदगावे, सुनील वडर यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)