छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी सह्यांची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:27 IST2021-04-02T04:27:55+5:302021-04-02T04:27:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मावळा प्रतिष्ठाण व राॅयल युथ फाउंडेशनने छत्रपती संभाजी महाराज यांचा शहरात पुतळा उभारण्यासाठी महापालिकेकडे ...

छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी सह्यांची मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मावळा प्रतिष्ठाण व राॅयल युथ फाउंडेशनने छत्रपती संभाजी महाराज यांचा शहरात पुतळा उभारण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा केला. त्याला यश आले असून महापालिकेच्या अर्थसंकल्पात १५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. आता हा पुतळा कर्मवीर चौकात उभारावा, यासाठी प्रतिष्ठाणच्या वतीने सह्यांची मोहीम हाती घेणार असल्याचे अध्यक्ष ऋषीकेश पाटील यांनी सांगितले.
पाटील म्हणाले की, शहरात छत्रपती संभाजी महाराज यांचा एकही पुतळा नाही. त्यासाठी मावळा प्रतिष्ठाणच्या वतीने आंदोलन हाती घेतले होते. महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, स्थायी सभापतींना निवेदनही देण्यात आले. या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. नुकतेच महापालिकेच्या अर्थसंकल्पात या पुतळ्यासाठी १५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्याबद्दल महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा प्रतिष्ठाणच्या वतीने सत्कारही करण्यात आला.
आता छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा कर्मवीर चौकात उभारावा यासाठी प्रयत्न करणार आहोत. शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजीराव भिडे यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. सध्या महापालिकेच्या वतीने काळी खण सुशोभीकरण हाती घेतले आहे. त्यात कर्मवीर चौक हा शहराच्या मध्यवर्ती आहे. भविष्यात हा परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे. त्यामुळे उर्दू हायस्कूलला लागून असलेल्या महापालिकेच्या जागेत हा पुतळा व्हावा, यासाठी सह्यांची मोहीम हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रोहित पाटील, यश माने, रोहित भाजनाईक, शुभम देवके, अक्षय सावंत, सुहेल तांबोळी उपस्थित होते.
चौकट
भाजपला आताच जाग
गेली अडीच वर्षे महापालिकेत भाजपची सत्ता होती. या काळात भाजपच्या नगरसेवकांना छत्रपती संभाजी महाराज यांची आठवणही झाली आहे. आता मावळा प्रतिष्ठाणने पाठपुरावा केल्यानंतर भाजपच्या नगरसेवकांना जाग आली आहे. इतके दिवस ते झोपले होते का? असा सवालही पाटील यांनी केला.